१४ जून २०२० रोजी बॉलीवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन झालं. मुंबईतील बांद्रा येथील भाड्याच्या निवासस्थानी त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या निधनाला चार वर्ष झाली. जरी तो आज शरीराने आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी कायम आहेत. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील ५ डिसेंबरच्या भागात सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. ‘बिग बॉस १८’मधील एका सदस्याला दारू सोडण्यासाठी सुशांत सिंह राजपूतने मदत केली होती. याबद्दल त्या सदस्याने स्वतः सांगितलं.
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात काही खास पाहुणे येऊन सदस्यांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत. ४ डिसेंबरच्या भागात प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता, लेखक अनुराग कश्यपने शिल्पा शिरोडकर, विवियन डिसेना, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर ५ डिसेंबरच्या भागात ‘लल्लनटॉप’ या वृत्तसंस्थेचे पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी घरातील सदस्यांशी संवाद साधला. करणवीर मेहराशी संवाद साधताना त्यांनी अनेक गंभीर प्रश्न विचारले. याच वेळी सौरभ यांनी करणला सुशांत सिंह राजपूतबद्दल विचारलं.
सौरभ द्विवेदी यांनी विचारलं की, सुशांत सिंह राजपूतला तू केव्हा भेटला होतास? तेव्हा करणवीर म्हणाला, “२०१४मध्ये मी सुशांत भेटलो होतो. अंकिता लोखंडेच्या घरी भेटलो होतो.” त्यानंतर सौरभ म्हणाले, “मी एक तुझी मुलाखत पाहिली. ज्यामध्ये तू सांगत होतास की, जेव्हा तू व्यसनाधीन झाला होतास तेव्हा तुला सुशांतने कशी मदत केली?”
सौरभ यांच्या या प्रश्नाचं उत्तर देत करण म्हणाला, “हां, सुशांतने खूप मदत केली होती. कारण त्यावेळेस करिअरला उतरती कळा लागली होती. सुशांत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. तो खूप स्पष्ट मत मांडायचा. तो खूप नियोजनबद्ध असायचा. तो मला म्हणायचा, तू ५ वर्षांनंतर स्वतःला कुठे पाहातोय? तर तसं तू नियोजन कर. तसंच त्याने त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची भेट घडून दिली. त्याने खूप मदत केली.”
त्यानंतर सौरभ यांनी विचारलं की, कधी तुला वाटलं का, त्याला तुझ्या मदतीची गरज आहे. तेव्हा करणवीर मेहरा म्हणाला, “नाही, मला कधी असं वाटलं नाही. जेव्हा त्याचं निधन झालं तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. कारण तो आयुष्यात खूप क्लिअर होता. त्याने मला एक डायरी दाखवली होती. ज्यामध्ये त्याने १२ दिग्दर्शकांची नाव लिहिली होती; ज्यांच्याबरोबर तो काम करू इच्छित होता. २०१०-११मध्ये लिहिलं होतं आणि त्यातल्या ६ ते ८ जणांबरोबर त्यानं काम केलं होतं. तसंच तो पुन्हा त्यांच्याबरोबर काम करणार होता.”
हेही वाचा – ‘या’ दोन लोकप्रिय मराठी मालिका लवकरच होणार बंद; एक तर पाच महिन्यांपूर्वीच झालेली सुरू
सुशांतचं निधनाचं वृत्त पाहून करणवीरच्या कुटुंबाला बसला होता मोठा धक्का, तीन तास…
पुढे करणवीर म्हणाला, “जेव्हा त्याच्या निधनाबद्दल कळालं तेव्हा मी दिल्लीत होता. तो माझ्या आईला खूप मानायचा. तो माझ्या कुटुंबाच्या खूप जवळचा होता. आम्ही एकत्र बसून जेवायचो वगैरे. जेव्हा त्याचं निधन झालं. तेव्हा माझ्या एका मित्राने मला सांगितलं, बातम्या बघ. मग मी आईला वगैरे बोलावून घेतलं. म्हटलं, घाबरू नका. हे खरं आहे की नाही, माहित नाही. तो माझ्या कुटुंबातील सगळ्यांचा जवळचा होता. जेव्हा आम्ही टीव्हीवर पाहिलं तेव्हा आम्ही अडीच ते तीन तास एकमेकांबरोबर बोललो नव्हतो. आम्हाला मोठा धक्का बसला होता.”