सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस १८’ची नुकतीच धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. अठराव्या पर्वात १८ स्पर्धक सहभागी झाले आहेत. आता या शोमध्ये जाण्याआधी अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत. यापैकी एक नायरा बॅनर्जी आहे.
काय म्हणाली नायरा बॅनर्जी?
नायरा बॅनर्जीने ‘फिल्मीज्ञान’ (Filmygyan)ला मुलाखत दिली होती. यावेळी तिला विचारण्यात आले की, याआधी तुझ्या काही मित्रांनी बिग बॉसचा शो केला आहे, त्यांनी तुला काय सल्ला दिला? यावर नायराने म्हटले, “त्यांनी मला या शोसाठी काही वेगळी तयारी करायला सांगितली नाही किंवा करवून घेतली नाही. या शोमध्ये जाण्यासाठी मला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी मला सांगितले आहे की, तुझं जसं व्यक्तिमत्व आहे, तशीच राहा आणि त्या घरात आनंद घे; कोणी मला हे सांगितले नाही की हे करू नकोस, ते करू नकोस. शिव ठाकरेनेदेखील मला हेच सांगितले आहे की तू तिथले तीन महिने आनंदात घालव, मजा कर आणि जेव्हा भांडणे होतील, समस्या निर्माण होतील, त्यावेळी शांत बसू नकोस. तू तुझं मत मांड. कारण लोकांना तुझं मत काय आहे, हेदेखील जाणून घ्यायचं आहे. जरी ती भांडणे इतरांची होत असतील तरीसुद्धा तुम्ही एक स्पर्धक आहात, बाहेरच्या लोकांना तुमचा दृष्टिकोनदेखील जाणून घ्यायचा असतो, फक्त शांत बसू नकोस”, एवढंच त्याने मला सांगितलं आहे.
नायरा बॅनर्जी आणि शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये सहभागी झाले होते. शिव ठाकरे बिग बॉसच्या १६ व्या पर्वाचा उपविजेता ठरला होता, तर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता आहे.
नायरा बॅनर्जीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तेलुगु, मल्याळम, कन्नड, तमिळ आणि हिंदी चित्रपटांत तिने काम केले आहे. याबरोबरच ती हिंदी टीव्ही मालिकांमध्ये दिसली होती. ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये तिने केलेल्या स्टंटची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. आता नायरा बिग बॉसच्या घरात काय कमाल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बिग बॉसच्या आधीच्या पर्वात सहभागी झालेले निशांत आणि पारस हेदेखील नायराचे मित्र आहेत. या सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत, विशेष कोणतीही तयारी करायला सांगितलेले नाही, असे नायराने म्हटले आहे.
दरम्यान, या पर्वात स्पर्धकांबरोबर एक गाढवदेखील बिग बॉसच्या घरात असणार आहे. त्यामुळे या पर्वात काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.