Bigg Boss 18: हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता चौथा आठवडा सुरू झाला आहे. हादेखील आठवडा वादाने सुरू झाला असून पहिल्याच दिवशी म्हणजे २८ ऑक्टोबरच्या भागात घरातील सदस्यांमध्ये ड्युटीवरून वाद झाले. सोमवारच्या भागात, ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना सर्वात जास्त अस्ताव्यस्त असणारा सदस्य कोण आहे? असं विचारलं. तेव्हा विवियन डिसेनासह तीन जणांनी चाहत पांडे असल्याचं सांगितलं. त्यामुळे ‘बिग बॉस’ने चाहत पांडेला ड्युटी वाटपाचा अधिकार दिला. तसंच सदस्य नीट ड्युटी करतात की नाही? हेदेखील चाहतला पाहायचं होतं. पण, काहीजण रात्री उशीरा ड्युटी करत असल्यामुळे घरात वाद झाले.
विवियन आणि अविनाश रात्री १२ वाजता ड्युटी करत होते. त्यावेळी सतत आवाज होतं असल्यामुळे जेलमध्ये असणाऱ्या सारा आणि तजिंदर बग्गाला त्रास झाला. यावेळी साराने विवियन, अविनाश, ईशा आणि एलिसला आवाज कमी करण्याची विनंती केली. पण त्यानंतरही त्यांचा आवाज कमी झाला नाही. त्यामुळे शेवटी साराने घरातील इतर सदस्यांना उठवलं. मग अरफीन खान, शिल्पा शिरोडकर, रजत दलाल, शहजादा हे सगळेजण किचन साफ करत असलेल्यांना शांतेत काम करा हे सांगण्यासाठी आले. पण काही वेळाने याचं रुपांतर वादात झालं. यावरूनच आता रजत दलाल आणि अविनाश मिश्रामध्ये जोरदार भांडण झाल्याचा प्रोमो समोर आला आहे.
चाहत पांडेने अविनाशला ड्युटी पूर्ण झाल्यानंतर तिला सांगायचं, अशी सूचना दिली होती. तिच अविनाशला खटकली. त्यामुळे अविनाशने रात्री उशीरा ड्युटी करून चाहतला झोपूच द्यायचं नाही हे ठरवलं. यावरून रजत आणि अविनाशमध्ये भांडण झालं आहे. रजत अविनाशची कॉलर पकडून चाहतसाठी भांडताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये चाहत अविनाशला विचारते की, अविनाश तू टेबल साफ नाही केलास? तेव्हा अविनाश म्हणाला, “मी तुला का सांगू?” त्याच वेळेस रजत म्हणतो, “तू तिला रात्रीचा त्रास का देतोय? इथे विनाकारण मुलींना रात्री त्रास देऊ नाही शकत.” त्यानंतर रजत आणि अविनाशमध्ये जोरदार भांडण होताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, तिसऱ्या आठवड्यात घरातील दोन सदस्य बेघर झाले. तिसऱ्या आठवड्याच्या मधेच मुस्कान बामने हिला घरातील सदस्यांनी बहुमताने घराबाहेर केलं. त्यानंतर वीकेंड वारला प्रेक्षकांच्या मतानुसार नायरा बनर्जी एविक्ट झाली. आतापर्यंत ‘बिग बॉस १८’मधून चार सदस्य बेघर झाले आहेत. मुस्कान आणि नायराच्या आधी हेमा शर्मा, गुणरत्न सदावर्ते हे दोघं घराबाहेर झाले होते.