‘बिग बॉस’चं १८वं पर्व गाजवणारा उपविजेता विवियन डिसेना सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात असताना त्याला सतत ‘लाडला’ टॅग वापरला जात होता, त्यामुळे आता एका मुलाखतीमध्ये त्याने हा ‘लाडला’ टॅग त्याच्यासाठी का वापरला गेला याचा खुलासा केला आहे. विवियनने यामध्ये त्याला ‘कलर्स’ चॅनेल सोडण्यासाठी ऑफर मिळाली होती, असाही खुलासा केला आहे.

विवियन डिसेना नुकताच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये गेला होता, यावेळी त्याची पत्नी नूरान अलीसुद्धा त्याच्याबरोबर तेथे उपस्थित होती. मुलाखतीमध्ये विवियनला ‘लाडला’ टॅगबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला, “‘बिग बॉसच्या’ घरात असताना अनेकांना वाटत होतं की मी ‘लाडला’ टॅगचा वापर करून अनेक फायदे मिळवू शकलो असतो आणि पुढे जाऊ शकलो असतो. मात्र, माझ्या नजरेत हे चुकीचं होतं. मला ‘कलर्सचा लाडला’ यासाठी म्हटलं जातं, कारण गेल्या अनेक वर्षांपासून मी याच वाहिनीसह काम करत आहे.”

‘कलर्स’सोडण्यासाठी दिली होती ऑफर

विवियनने पुढे सांगितलं, “एकदा एका नेटवर्कने मला ‘कलर्स’ सोडण्यासाठी मोठी ऑफर दिली होती. ‘कलर्स’ने मला बनवलं आहे, त्यामुळे मला इथे काम आहे, त्यावेळी दुसऱ्या चॅनेलला मी प्राधान्य देऊ शकत नाही. ‘कलर्स’बरोबर माझी लढाई एकाच गोष्टीवरून होते, ती म्हणजे नाविन्य. मला नेहमी काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते. कारण त्याच त्याच गोष्टी पाहून प्रेक्षक कंटाळतात, त्यामुळेच मी ठराविक भूमिका आणि कामं स्वीकारतो आणि त्या सर्व हिटसुद्धा होतात.”

‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड नाही…

मुलाखतीमध्ये विवियनने ‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड शो नसल्याचंही स्पष्ट केलं. तो म्हणाला, “हा शो कधीच स्क्रिप्टेड नसतो. अनेक व्यक्तींना अद्यापही याचे नियम पूर्णत: माहिती नाहीत. जेव्हा परदेशातून तुम्ही एखादा शो घेऊन येता तेव्हा त्याचे काही नियम मान्य करावे लागतात, अन्यथा आंतरराष्ट्रीय स्थरावर अडचणी निर्माण होऊ शकतात.”

‘लाडला’ टॅगचा दुरुपयोग केला नाही

“मला सर्व जण कलर्सचा लाडला म्हणतात. मात्र, या टॅगचा मी कधीही दुरुपयोग केला नाही. लोकांनी माझ्याबद्दल एक समज करून ठेवला होता. त्यांना वाटत होतं मला प्राधान्य मिळेल. घरात फक्त माझ्यासाठी स्पेशल कॉफी येत नव्हती, इतरांनाही मिळत होती. मात्र, मला तिथे हायलाईट करण्यात आलं. घरातील जे सदस्य जिम आणि डाएट करत होते त्यांच्यासाठी बदामचं दूध दिलं जात होतं. मात्र, अनेकदा फक्त माझ्याच कॉफीला हायलाईट करून दाखवण्यात आलं”, असं विवियन पुढे म्हणाला.

Story img Loader