Bigg Boss 18: ‘बिग बॉस’चं १८वं पर्व आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. सध्या अंतिम आठवडा सुरू आहे. १९ जानेवारीला महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. अवघे चार दिवस महाअंतिम सोहळ्याला बाकी आहेत. पण त्यापूर्वी मिड वीक एविक्शन झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस’च्या १८च्या पर्वाचे टॉप-६ सदस्य भेटले आहेत.
१४ जानेवारीच्या भागात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सदस्यांना पत्रकारांच्या परखड प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. अविनाश मिश्रा, ईशा सिंह, विवियन डिसेना, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, करणवीर मेहरा, रजत दलाल या सदस्यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले. यावेळी अविनाशचा पारा चढलेला पाहायला मिळाला. तसंच रजतने सडेतोड उत्तर दिली. त्यानंतर मिड वीक एविक्शन झाल्याचं समोर आलं आहे.
‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्याआधी चाहत्यांना धक्का बसेल असं एविक्शन झालं आहे. ‘द खबरी’च्या माहितीनुसार, मराठमोळी सदस्य शिल्पा शिरोडकरची महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचण्याची संधी हुकली आहे. अलीकडेच अभिनेत्री नम्रता शिरोडकरने बहीण शिल्पाला मत देण्यासाठी आवाहन केलं होतं. पण, मिड वीक एविक्शनमध्ये शिल्पा शिरोडकर एविक्ट झाली आहे.
नुकतेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते, दिग्दर्शक आणि ‘बिग बॉस’चं घर डिझाइन करणारे ओमंग कुमार ‘बिग बॉस’च्या घरात गेले होते. यावेळी ओमंग कुमार यांनी शिल्पा शिरोडकर बेघर झाल्याची घोषणा केली. त्यामुळे आता अविनाश मिश्रा, ईशा सिंह, विवियन डिसेना, चुम दरांग, करणवीर मेहरा, रजत दलाल यामधून कोण ‘बिग बॉस’चं १८वं पर्व विजयी होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा – ‘पाताल लोक २’ प्रदर्शित होण्याआधी अभिनेता जयदीप अहलावतच्या वडिलांचे निधन
दरम्यान, शिल्पा शिरोडकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ९०च्या दशकातील बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री असून सेन्सेशनल क्वीन म्हणून तिला ओळखलं जातं. शिल्पा १० नापास आहे. पण संपत्तीबाबतीत ती धाकटी बहीण नम्रतापेक्षा श्रीमंत आहे. १९८९मध्ये रमेश सिप्पी यांच्या ‘भ्रष्टाचार’ चित्रपटातून शिल्पाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. २०००मध्ये लग्नानंतर शिल्पाने बॉलीवूडला रामराम केलं. ती लंडनला गेली आणि तिथे ती वैवाहिक आयुष्य एन्जॉय करू लागली. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सर्वकाही सोडून शिल्पा गृहिणी झाली. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितलं होतं की, १०वी नापास असल्यामुळे परदेशात नोकरी करू शकली नाही.
हेही वाचा – मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
शिल्पाचा नवरा बँकर असून अपरेश रंजीत असं त्याच नाव आहे. दोघांना एक मुलगी आहे; जिचं अनुष्का नाव आहे. अनुष्का लंडनमध्येच राहते. माध्यमांच्या माहितीनुसार, शिल्पाची २३७ कोटींची संपत्ती आहे.