Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या सहाव्या आठवडा सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून विवियन डिसेना ‘टाइम गॉड’ ( Time God ) आहे. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा पहिला ‘टाइम गॉड’ अरफीन खान झाला होता. त्यानंतर विवियनकडे ही जबाबदारी आली. गेले दोन आठवडे विवियन ही जबाबदारी पार पाडत आहे. पण आता सहाव्या आठवड्यात विवियननंतर मराठी अभिनेत्री ‘टाइम गॉड’ झाल्याचं समोर आलं आहे.
नुकताच ‘टाइम गॉड’ होण्यासाठी एक टास्क झाला. हा टास्क जोड्यांमध्ये खेळला गेला. जी जोडी शेवटपर्यंत टिकणार ती जोडी ‘टाइम गॉड’ होण्यासाठी निवडली जाणार होती. यावेळी चाहत पांडे आणि कशिश कपूरला कोणीही जोडीदार मिळाला नव्हता. त्यामुळे ‘टाइम गॉड’च्या टास्कच्या संचालनाची जबाबदारी चाहत आणि कशिशला देण्यात आली.
‘टाइम गॉड’च्या टास्कमध्ये एकूण सहा जोड्या होत्या. विवियन डिसेना-ईशा सिंह, अविनाश मिश्रा-एलिस कौशिक, दिग्विजय सिंह राठी-श्रुतिका अर्जुन, करण वीर मेहरा-चुम दरांग, रजत दलाल-शिल्पा शिरोडकर आणि तजिंदर सिंह बग्गा-सारा अरफीन खान या सहा जोड्यांमध्ये ‘टाइम गॉड’चा टास्क खेळला गेला. यावेळी सर्वात आधी संचालक चाहत आणि कशिशने विवियन-ईशाची जोडी बाद केली. त्यानंतर तजिंदर-सारा, अविनाश-एलिस, दिग्विजय-श्रुतिका अशा अनुक्रम जोड्या बाद करण्यात आल्या. शेवटी करण-चुम आणि रजत-शिल्पा या दोन खेळल्या. या दोन जोड्यांमधील रजत-शिल्पा शिरोडकर यांना विजयी जोडी म्हणून घोषित केलं.
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”
‘बिग बॉस खबरी’च्या माहितीनुसार, रजत दलाल आणि शिल्पा शिरोडकर यांच्यामधील शिल्पा ‘टाइम गॉड’ झाली आहे. विवियन डिसेनानंतर शिल्पाकडे ‘बिग बॉस १८’च्या घराची जबाबदारी आली आहे. अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, रजत ‘टाइम गॉड’ झाला पाहिजे होता म्हणजे अजूनच घरात राडा झाला असता.
दरम्यान, करणवीर मेहरा, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन, कशिश कपूर, रजत दलाल, दिग्विजय राठी, तजिंदर सिंह बग्गा हे सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे सहाव्या आठवड्यात या सात सदस्यांमध्ये कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.