Bigg Boss च्या १८ व्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. रविवारी (६ ऑक्टोबर) या पर्वाचा ग्रॅण्ड प्रीमियर पार पडला. त्यामध्ये सहभागी झालेल्या सदस्याची विविध कारणांमुळे चर्चा होत आहे. आता अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, यावर तिने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे.

बिग बॉसमध्ये येण्याचे ‘हे’ आहे कारण

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली होती. त्यावेळी बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल सांगताना अभिनेत्रीने म्हटले होते, “प्रामाणिकपणे सांगायचे तर मी या शोची फार मोठी चाहती आहे. ज्यावेळी मी हा शो पाहायचे, त्यावेळी माझी मुलगी मला म्हणायची तूसुद्धा या शोमध्ये गेले पाहिजे. मी बिग बॉसच्या घरात जाणार असल्याने माझे कुटुंब खूप आनंदात आहे. मी कामाच्या शोधात होते. माझी मुलगी आता २० वर्षांची आहे आणि माझा नवरा त्याच्या कामानिमित्त सतत प्रवास करीत असतो. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये परत येऊन मला माझ्यासाठी काहीतरी करायचे होते. मी काम मिळविण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांना मी काम आहे का, असे विचारले. प्रत्येकाने मला काम नसल्याचे सांगितले. मी कलाकार आहे, ते माझे काम आहे, त्यामुळे मी बिग बॉसमध्ये जाण्याचा विचार केला. या शोसारखा दुसरा मोठा प्लॅटफॉर्म कुठला असू शकतो?

“तेव्हा लोक मला भेटायलासुद्धा तयार नव्हते”

बिग बॉसशी जोडले गेलेले कलाकार बऱ्याचदा सारखेच असतात, यावर बोलताना शिल्पाने म्हटले, “मला याबद्दल खूप विचारले गेले आणि प्रत्येक वेळी मी हेच सांगितले आहे की, बिग बॉसमध्ये यायच्या आधी मी काम कऱण्याची संधी आहे का? हे विचारण्यासाठी अनेकांना फोन केले; पण कोणीही माझा फोन उचलला नाही आणि जर कोणी उचलला, तर सध्या इंडस्ट्रीमध्ये काही घडत नाहीये, असे सांगितलं गेलं. जर तशी काही संधी असेल, तर तुला पुन्हा फोन करून कळवू अशा प्रकारची उत्तरं दिली गेली. हे माझ्याबरोबर मोठ्या प्रमाणात घडले. मी कलाकार आहे, मला काम हवे आहे आणि बिग बॉससुद्धा काम आहे. लोक याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात; पण हे तुमचं काम आहे. यानंतर मला अधिक काम मिळावं हे माझं ध्येय आहे. मी इथे खोटं बोलत नाहीये, जेव्हा मी काम शोधत होते तेव्हा लोक मला भेटायलासुद्धा तयार नव्हते.”

शिल्पाने अमिताभ बच्चन, अनिल कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, गोविंदा आणि अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. जेव्हा तिला विचारले की, ती तिच्या कामाचे अनुभव या शोमध्ये सांगणार का, तर तिने हो म्हटले. यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “या शोमध्ये माझे अनुभव शेअर करायला मला नक्कीच आवडेल. मी १६ वर्षांची असताना माझ्या करिअरची सुरुवात झाली. ही इंडस्ट्री मला माझ्या घरासारखी आहे. माझ्याकडे खूप चांगल्या आठवणी आहेत.”

हेही वाचा: “मला खूप काम करायला लावतात,” असं म्हणत राजेश खन्नांनी दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात काम करण्यास दिलेला नकार

अभिनेत्रीने पुढे म्हटले, “प्रत्येक दिवशी आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळायचं. आता हे बदललं आहे. कारण- लोकांकडे वेळ नाहीये. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ असायचो, आमच्यामध्ये नाती तयार व्हायची. कारण- आतासारखे त्या काळात ३० दिवसांत चित्रपट बनवून व्हायचा नाही. चित्रपट संपूर्ण बनून तयार होण्यास काही वर्षं लागायची. इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकारांबरोबर मी मोठी झाले आणि एकाही दिवशी त्यांनी मला असं वाटू दिलं नाही की, मी नवीन आहे. काय चुकीचं, काय बरोबर हे सांगायला, शिकवायला आणि मार्ग दाखवायला हे दिग्गज कलाकार नेहमीच असायचे.”

शिल्पाने पुढे म्हटले, “सध्या मी कोणाच्याही संपर्कात नाही. सगळे आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. २००० साली माझं लग्न झालं आणि मी दुसऱ्या देशात गेले. ते संपूर्णपणे वेगळं आयुष्य होतं. त्यामुळे मी कोणाच्याही सतत संपर्कात नव्हते. पण कशाचीही गरज लागली, तर मी त्यांना फोन करते आणि तेदेखील तिथे माझ्यासाठी असतात.”

अमिताभ बच्चन यांनी ‘ही’ गोष्ट शिकवली

अमिताभ बच्चन यांच्याविषयी आठवण सांगताना शिल्पाने म्हटले, “अमिताभ बच्चन यांनी मला वेळेचं महत्त्व शिकवलं. ते पहाटेच्या ४ च्या शिफ्टसाठी ३.४५ ला यायचे. त्यांनी कधीच कोणालाच वाट पाहायला लावली नाही. ते आजही त्याच आवडीनं काम करतात, ते पूर्वी होते तसेच आजही आहेत. अनिल कपूर यांनी शिस्तीचं महत्त्व शिकवलं. ते जर एखादी भूमिका करीत असतील, तर त्याच भूमिकेत ते सेटवर वावरतात. कामाविषयी असलेलं समर्पण आजही त्यांच्या कामातून दिसून येतं.”

दरम्यान, शिल्पा शिरोडकर ही अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण असून, प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची मेहुणी आहे. आता बिग बॉस १८ मध्ये शिल्पा कसा खेळ खेळणार हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असणार आहे.