Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा १०५चा दिवसांचा प्रवास १९ जानेवारीला संपला. ६ ऑक्टोबर २०२४पासून सुरू झालेलं हे पर्व चांगलं गाजलं. वाइल्ड कार्डसह एकूण २३ सदस्य ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी झाले होते. पण यामधील विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि रजत दलाल हे सहा सदस्य अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. यामधील करणवीर मेहराने बाजी मारली. तर विवियन डिसेना फर्स्ट रनर-अप आणि रजत दलाल सेकंड रनर-अप ठरला. पण, ‘बिग बॉस’च्या घरातील शत्रूत्व शोनंतरही पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा फर्स्ट रनर-अप विवियन डिसेना आणि त्याची पत्नी नूरन अलीने नुकतीच सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या सक्सेस पार्टीला अविनाश मिश्रा, ईशा सिंह, यामिनी मल्होत्रा, एडिन रोज, चाहत पांडे, अरफीन खान, सारा खान, हेमा शर्मा, मुस्कान बामने, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, विकी जैन असे अनेक कलाकार पाहायला मिळाले. पण या पार्टीला विवियनने करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर यांना आमंत्रण दिलं नव्हतं. करण, शिल्पासह चुम दरांग, दिग्विजय सिंह राठी, श्रुतिका अर्जुन, रजत दलाल विवियनच्या पार्टीत पाहायला मिळाले नाहीत. विवियनच्या सक्सेस पार्टीचे व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
विवियनच्या सक्सेस पार्टीतल्या केकने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. या केकवर लिहिलेल्या मेसेजमधून विवियने अप्रत्यक्षरित्या करणवीर मेहराला टोल लगावल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर लिहिलं होतं की, किंग ट्रॉफी जिंकतात आणि लेजेंड मनं जिंकतात. पार्टीमध्ये केकवर लिहिलेला हा मेसेज यामिनी मल्होत्राने जोरात वाचून दाखवला; ज्यावर सर्व उपस्थित असलेले कलाकार टाळ्या वाजवताना दिसत आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा विजेता मुनव्वर फारुकीला पार्टीत करणवीर मेहराच्या विजयाबाबत प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला की, करणवीरला शुभेच्छा…तुम्हाला जे हवंय ते उत्तर देऊ का? आम्हाला वाटलं होतं, विवियन आणि रजतला तगडी व्होटिंग झाली आहे. पण, मधे तिसराच आला.