Bigg Boss 18: हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातून वकील गुणरत्न सदावर्ते अवघ्या आठ दिवसांत घराबाहेर झाले. घरात सर्वात एंटरटेनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदावर्तेंना १५ ऑक्टोबरला अचानक शोबाहेर काढण्यात आलं. न्यायालयात प्रलंबित खटल्यामुळे काही काळासाठी घराबाहेर काढत असल्याचं ‘बिग बॉस’ने सांगितलं. पण नेमकं कारण काय होतं? याबाबत स्वतः गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं आहे.
नुकतीच गुणरत्न सदावर्तेंसह त्यांची पत्नी जयश्री पाटील यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी गुणरत्न सदावर्तेंना विचारलं की, ‘बिग बॉस १८’मधून बाहेर काढण्यामागचं नेमकं कारण काय होतं? तिथे काही प्रोब्लेम होता का? यावर सदावर्ते म्हणाले, “पहिला एक मुद्दा लक्षात घ्या, आम्ही जे बाहेर आहोत ते काल आहोत, आज आहोत आणि ते उद्याही राहणार आहोत. ‘बिग बॉस’मधून तेवढ्या दिवसांत मला बाहेर येणं आवश्यक होतं. ते न्यायालयाचे मनसुबे देखील ओळखले. आपण सगळ्या माध्यमांनी दाखवलं. किती महत्त्वाचं आहे. मी त्या तारखेला बाहेर यायचं असं करारात निश्चित झालं होतं. पुढे तुम्ही विचारलं, तिथे काही प्रोब्लेम होता का? तुम्ही पाहिलं असेल जे ‘बिग बॉस’च्या घरातील कलाकार आहेत ते स्ट्रगलर आहेत. ती स्ट्रगल करणारी मंडळी आहेत. म्हणून मी त्यांना एक गोंडस असं नाव दिलं. उबले चने फ्यूचर हिरो. ‘बिग बॉस’मधील सगळे कलाकार उबले चने फ्यूचर हिरो आहेत असं मला वाटायचं.”
पुढे गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “‘बिग बॉस’मधील कलाकारांनी माझ्याकडून योग शिकला. माझ्याकडून त्यांनी हनुमान चालीसा पठण कशी करायची? हे शिकलं. माझ्याकडून चिंतन कसं करायचं? हे त्यांनी शिकलं. तसंच जेलचा संघर्ष कसा करावा? असं हे सुद्धा शिकवलं. त्यांनाही लोकशाही समजली. त्यामुळे मला असं वाटतं, माझ्या प्रती अनास्था किंवा ते १७ सदस्य जे मला खतरा मानत होते. त्यांना माझ्या व्यक्तिगत काय अनास्था असेल असं बिलकुल नाही. ते खूपच छान होते. कोणासाठी शो रोमान्स होतो. तर कोणासाठी तो निव्वल एंटरनेटमेंट होतो. माझ्यासारख्या वकील असलेल्या व्यक्तीला ते काहीतरी होतं आणि ते झालं.”
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते हे हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील सर्वाधिक एंटरटेनर सदस्य होते. प्रेक्षकांसह सलमान खानने देखील त्यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते घराबाहेर झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
© IE Online Media Services (P) Ltd