१९ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या पर्वाचा विजेता करणवीर मेहरा ठरला. त्यामुळे सध्या करण खूप चर्चेत आहेत. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर येताच करण खास मित्रांना भेटताना दिसत आहे. नुकतीच त्याने सुशांत सिंह राजपूतसाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून करणने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
बॉलीवूडचा हरहुन्नरी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज जन्मदिवस आहे. त्यामुळे सध्या त्याचे चाहते आणि इतर कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे त्याच्या आठवणी शेअर करत जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. याचनिमित्ताने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता करणवीर मेहराने खास पोस्ट शेअर केली आहे.
करणने इन्स्टाग्रामवर सुशांतबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघं मस्ती करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत करणवीरने लिहिलं आहे की, हे क्षण पाहण्यासाठी तू असायला पाहिजे होतास. तुला जन्मदिनाच्या शुभेच्छा भाई. करणवीर मेहराची ही इन्स्टाग्राम स्टोरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात करणने सुशांतची सांगितली होती ‘ही’ आठवण
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात असतानाही करणवीर मेहराने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला होता. पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी करणला विचारलं होतं की, सुशांत सिंह राजपूतला तू केव्हा भेटला होतास? तेव्हा करण म्हणाला होता, “२०१४मध्ये मी सुशांत भेटलो होतो. अंकिता लोखंडेच्या घरी भेटलो होतो.” त्यानंतर सौरभ म्हणाले, “मी एक तुझी मुलाखत पाहिली. ज्यामध्ये तू सांगत होतास की, जेव्हा तू व्यसनाधीन झाला होतास तेव्हा तुला सुशांतने कशी मदत केली?” यावर करणने सांगितलं होतं की, हां, सुशांतने खूप मदत केली होती. कारण त्यावेळेस करिअरला उतरती कळा लागली होती. सुशांत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. तो खूप स्पष्ट मत मांडायचा. तो खूप नियोजनबद्ध असायचा. तो मला म्हणायचा, तू ५ वर्षांनंतर स्वतःला कुठे पाहातोय? तर तसं तू नियोजन कर. तसंच त्याने त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची भेट घडून दिली. त्याने खूप मदत केली.
त्यानंतर सौरभ यांनी विचारलं होतं की, कधी तुला वाटलं का, त्याला तुझ्या मदतीची गरज आहे. तेव्हा करणवीर मेहरा म्हणाला होता, “नाही, मला कधी असं वाटलं नाही. जेव्हा त्याचं निधन झालं तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. कारण तो आयुष्यात खूप क्लिअर होता. त्याने मला एक डायरी दाखवली होती. ज्यामध्ये त्याने १२ दिग्दर्शकांची नाव लिहिली होती; ज्यांच्याबरोबर तो काम करू इच्छित होता. २०१०-११मध्ये लिहिलं होतं आणि त्यातल्या ६ ते ८ जणांबरोबर त्यानं काम केलं होतं. तसंच तो पुन्हा त्यांच्याबरोबर काम करणार होता.”
पुढे करणवीर म्हणाला, “जेव्हा त्याच्या निधनाबद्दल कळालं तेव्हा मी दिल्लीत होता. तो माझ्या आईला खूप मानायचा. तो माझ्या कुटुंबाच्या खूप जवळचा होता. आम्ही एकत्र बसून जेवायचो वगैरे. जेव्हा त्याचं निधन झालं. तेव्हा माझ्या एका मित्राने मला सांगितलं, बातम्या बघ. मग मी आईला वगैरे बोलावून घेतलं. म्हटलं, घाबरू नका. हे खरं आहे की नाही, माहीत नाही. तो माझ्या कुटुंबातील सगळ्यांच्या जवळचा होता. जेव्हा आम्ही टीव्हीवर पाहिलं तेव्हा आम्ही अडीच ते तीन तास एकमेकांबरोबर बोललो नव्हतो. आम्हाला मोठा धक्का बसला होता.”