Bigg Boss 18 Winner Karanveer Mehra : ‘बिग बॉस’च्या अठराव्या सीझनच्या विजेतेपदावर करणवीर मेहराने आपलं नाव कोरलं आहे. यंदा ‘बिग बॉस’चा ‘अल्टिमेट लाडला’ कोण होणार विवियन की करण? यावरून प्रेक्षकांमध्ये अनेक चर्चा रंगल्या होत्या. अखेर या खेळात करणवीर मेहराने बाजी मारली आहे. यापूर्वी अभिनेत्याने ‘खतरों के खिलाडी’चा १४ वा सीझन सुद्धा जिंकला होता. इंडस्ट्रीत १९ वर्षे अधिराज्य गाजवून अखेरीस करणवीर मेहरा ‘बिग बॉस’च्या १८ व्या सीझनचा विजेता ठरला आहे. त्याने या करिअरची सुरुवात कशी केली, अभिनेत्याचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
करणने २००५ मध्ये टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्याआधी अभिनेता थिएटर करत होता. लहानपणापासूनच त्याला अभिनय क्षेत्रात रस होता. तो गेली १९ वर्षे इंडस्ट्रीत काम करत आहे. ‘रिमिक्स’ मालिकेतून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अंकिता लोखंडेबरोबर तो ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत सुद्धा झळकला होता. ‘बातें कुछ अनकही सी’, ‘बहनें’, ‘विरुद्ध’ अशा अनेक मालिकांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘रागिनी एमएमएस २’, ‘लव्ह स्टोरी २०५०’, ‘बदमाशियां’, ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटांमध्ये सुद्धा तो झळकला आहे. ‘पॉयझन २’, ‘इट्स नॉट सिंपल’ या वेबसीरिजमध्ये सुद्धा करणने काम केलं होतं. पण, करणला आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रसिद्धी अलीकडच्या काही वर्षांत मिळाली.
करणवीर मेहराचं वैयक्तिक आयुष्य
करणवीर मेहराचं वैयक्तिक आयुष्य त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त चर्चेत होतं. ‘बिग बॉस’च्या घरात सुद्धा यावरून अनेक चर्चा झाल्या आहेत. करणचे याआधी दोन घटस्फोट झाले आहेत. त्याचं पहिलं लग्न २००९ मध्ये झालं होतं. अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं नाव देविका ( पूर्वाश्रमीची पत्नी ) असं होतं. ९ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. देविका ही करणची चांगली मैत्रीण होती. दोघांनी डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, ‘बॉम्बे टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत या घटस्फोटासाठी त्याने स्वत:ला जबाबदार धरलं आहे.
यानंतर करणवीरने २०२१ मध्ये अभिनेत्री निधी सेठशी दुसरं लग्न केलं. पण, या दोघांच्या नात्यात अवघ्या दोन वर्षातच तणाव निर्माण झाला. २०२३ मध्ये करण आणि निधी यांनी घटस्फोट घेतला.
२०१६ मध्ये झालेला भीषण अपघात
२०१६ मध्ये करणवीर मेहराच्या दुचाकीला भीषण अपघात झाला होता. यानंतर जवळपास पाच महिने तो अंथरुणाला खिळून होता. त्या काळात झोप लागावी म्हणून करण दारू पिऊ लागला होता, दारुचं व्यसन जडल्याचं देखील त्याने मान्य केलं आहे. पण, त्यानंतर स्वत:वर नियंत्रण ठेऊन मोठ्या जिद्दीने करण पुन्हा एकदा उभा राहिला. त्याच्या एका पायात प्लेट देखील आहे. अशा परिस्थितीत दमदार कमबॅक करत करणने ‘खतरों के खिलाडी’ हा शो सुद्धा जिंकला आहे.
Bigg Boss Winner – करणवीर मेहरा
करणवीर मेहराने गेल्या शंभर दिवसात प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी जादू निर्माण केली. लाखो लोकांना करणवीर मेहराने हा शो जिंकावा असं वाटत होतं. अखेर प्रेम, मैत्री, गेम स्ट्रॅटेजी या सगळ्या गोष्टी उत्तम प्लॅन करुन अभिनेत्याने या शोमध्ये बाजी मारली. करणवीरने मेहराने ‘बिग बॉस’च्या अठराव्या पर्वाच्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरत तब्बल ५० लाख रुपये जिंकले आहेत. सध्या संपूर्ण हिंदी कलाविश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.