‘मुलगी झाली हो’ मालिका व ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे अभिनेते किरण माने घराघरांत लोकप्रिय झाले. सोशल मीडियावर सक्रिय राहून अनेकदा ते सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. सध्या त्यांच्या राजकीय पक्षप्रवेशाची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर रोखठोक भूमिका घेणाऱ्या किरण मानेंनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला.
अभिनेते किरण मानेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. “सगळ्यांना जय महाराष्ट्र! मी एक सामान्य कलाकार आणि सर्वसामान्य घरातील माणूस आहे. परिवर्तनाच्या चळवळीत मी कायम असतो आणि राहीन. आज समाजातील वातावरण गढूळ झालेलं आहे, संविधान धोक्यात आहे आणि अशावेळी उद्धव ठाकरे हे एकमेव नेता आहेत जे या विरोधात लढा देत आहेत. या लढाईत त्यांच्या पाठीशी उभं राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप विचार करून मी ही राजकीय भूमिका घेतली आहे.” असं किरण मानेंनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : ‘दादा एक गुड न्यूज आहे’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी करते ‘हे’ काम, लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल
“उद्धव ठाकरेंची वैचारिक नाळ प्रबोधनकार ठाकरेंशी जोडली गेली आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता जर एक झाल्या तर या प्रजेचे हाल कुत्रंही खाणार नाही हे प्रबोधनकारांचं वाक्य आज कुठेतरी खरं होऊ पाहतंय. अशावेळी एक संवेदनशील कलाकार तसेच भारताचा सजग नागरिक म्हणून मी गप्प बसू शकत नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला. आज पक्ष देईल ती जबाबदारी मी मनापासून पार पाडेन” असं किरण मानेंनी सांगितलं.
हेही वाचा : “…अन् मी मांसाहार सोडला”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा खुलासा; म्हणाली, “साडेपाच महिने…”
दरम्यान, किरण मानेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर शेवटचे ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकले होते. यामध्ये त्यांनी सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका निभावली होती. तसेच यापूर्वी त्यांनी ‘मुलगी झाली हो’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.