मनोरंजनसृष्टीत अनेक वर्षांपासून कलाकारांना कास्टिंग काऊचची समस्या सतावत आहे. अनेक कलाकारांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. फक्त अभिनेत्रीच नाही तर, अनेक अभिनेत्यांनाही कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. नुकतंच एका लोकप्रिय अभिनेत्याने कास्टिंग काऊचच्या त्याला आलेल्या अनुभवाबद्दल भाष्य केलं.
हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता झीशान खान याने नुकतीच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला एक मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याला आलेल्या काही धक्कादायक अनुभवांबद्दल भाष्य केलं. इंडस्ट्रीमधील एका नामवंत कास्टिंग डायरेक्टरने त्याच्याबरोबर एकदा चुकीचं कृत्य केल्याचं सांगत इंडस्ट्रीमधील पार्ट्यांची दुसरी बाजू ही त्याने उघड केली आहे.
तो म्हणाला, ” अनेकजण आम्ही अनेक बड्या सेलिब्रेटींना चान्स दिला आहे, असं म्हणून तुमच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करतात. माझ्या ओळखीत अशी अनेक जणं आहेत त्यांना काम मिळवण्यासाठी हे करावं लागलं आहे. पण मी असं काहीही कधी करत नाही कारण मला रात्री शांत झोपायचं असतं. हे सगळं समोर आलं तर काय होईल याची चिंता मला माझ्या मनाला लावून घ्यायची नाही. इंडस्ट्रीमधील एका अत्यंत नावाजलेल्या कास्टिंग डायरेक्टरने माझ्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती.”
पुढे त्याने सांगितलं, “तो कास्टिंग डायरेक्टर मला म्हणाला की, मला तुझी बॉडी बघायची आहे, तू तुझा टी-शर्ट काढ. त्यावर मी त्याला म्हटलं की मी तुम्हाला फोटो पाठवतो. तेव्हा तो मला म्हणाला की, फोटो तर एडीट करूनही पाठवता येतात. त्यामुळे मला आत्ता बघायचंय. टी-शर्ट काढायला माझी काही हरकत नव्हती त्यामुळे मी टी-शर्ट काढला. त्यानंतर तो मला म्हणाला की, मला तुझे पाय बघायचे आहेत तू पॅन्टही काढ. मी त्याला नकार दिला. मी त्याला म्हटलं की, तुम्ही माझे पाय पॅन्ट घातलेली असतानाच बघा. त्यावर तो कास्टिंग डायरेक्टर भडकला आणि म्हणाला तुझ्यासारखे खूप पाहिलेत जे आता नाही म्हणतात आणि दोन महिन्यांनी येऊन काहीही करा पण मला काम द्या असं म्हणतात.”
याच मुलाखतीत झीशानने इंडस्ट्रीमधील फिल्म इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या पार्ट्यांची दुसरी बाजूही समोर आणली. तो म्हणाला, “लोक तुम्हाला इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून फोन करतील आणि म्हणतील इथे एक इव्हेन्ट आहे. पण नंतर तुम्हाला कळेल की संपूर्ण इव्हेंट हा फक्त पार्टीचा एक भाग आहे. ते लोक फक्त तुम्हाला बॉक्सर परिधान करून डान्स करायला लावतील.” याचबरोबर एका पार्टीमध्ये एका फॅशन डिझायनरने त्याला किस करण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा झीशानने त्याच्या कानाखाली वाजवली होती, असा खुलासाही त्याने केला. झीशानचं हे बोलणं ऐकून आता सर्वांनाच धक्का बसला आहे.