मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत दोन वेळा उपोषण केलं. २ नोव्हेंबरला दुसरं उपोषण मागे घेताना मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. सध्या ते राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक त्यांना पाठिंबा देत आहेत. सामान्य जनतेप्रमाणे मराठी सिनेविश्वातील काही कलाकारांनी देखील जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
‘बिग बॉस’ फेम अभिनेते किरण माने अभिनय क्षेत्रासह नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत असतात. जरांगे पाटलांच्या साताऱ्यातील सभेचा एका व्हिडीओ किरण मानेंनी फेसबुकवर शेअर करत मराठा आरक्षणासंदर्भात आपलं मत मांडलं आहे.
किरण माने यांची पोस्ट
जरांगे पाटलांची राजधानी सातार्यातली सभा राजासारखी झाली… देखणी… रूबाबदार. मी खेडेगांवात लहानाचा मोठा झालोय. राजकीय नेत्यांसाठी सभेला गर्दी जमवणं किती सहजशक्य असतं, हे मी डोळ्यांनी पाहिलंय. कशा जीपा, ट्रक, टेम्पो भरून माणसं सभेला नेली जातात… कशा घोषणा दिल्या जातात. त्यानंतरच्या पार्ट्या, दारू सगळं माहितीय…अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य माणसाच्या सभेला उत्स्फूर्तपणे, मनापास्नं, स्वत:हून घरातून उठून सभेला जाऊन बसणारी माणसं बघायला मिळताहेत. भर उन्हात, रात्री दोन-दोन वाजेपर्यंत त्याची वाट पहातात. हे कुठल्याही नेत्याला आजच्या काळात शक्य नाही.
…मी सातारचं जरांगे पाटलांचं भाषण पूर्ण ऐकलं. जेवढ्या तळमळीनं लोक येतात, तेवढ्याच मनापासून, नितळ, स्पष्ट, परखड, सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस आहे. आरक्षणाविषयी सगळी कायदेशीर माहिती आहे. आरक्षणाचा लाभ घेणार्या इतर वर्गांविषयी जराही कटुता त्यांच्या मनात नाही. द्वेषभावना न पसरवता, ‘इतर जातीजमातींना दुखवू नका. ही नेत्यांनी निर्माण केलेली दुफळी आहे. मनातून आपण सगळे जातीधर्माचे लोक एक आहोत.’ असा सूर भाषणात असतो, जो आश्वासक आहे.
संविधान दिन जवळ आलाय. त्याचवेळी एका सामान्य नागरिकाच्या नेतृत्वाखाली, कुठल्याही राजकीय पाठबळाशिवाय, सांविधानिक मार्गाने एक भव्यदिव्य आंदोलन उभं रहाणं ही खूप प्रेरणादायी घटना आहे.
जय शिवराय… जय भीम.
किरण माने.
हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधतीचा नवीन लूक चर्चेत, अभिनेत्रीचा नवा हेअर कट पाहून सुकन्या मोनेंची खास कमेंट…
दरम्यान, किरण मानेंनी यापूर्वी अनेकदा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. साखळी उपोषण सुरू असताना त्यांनी साताऱ्यातील आंदोलकांची भेट देखील घेतली होती. किरण मानेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘कलर्स’ मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारत आहेत.