अभिनेत्री सोनाली पाटील (Sonali Patil) बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून घराघरांत पोहोचली. या पर्वातील विशाल निकम, विकास पाटील, मीनल शाह व सोनाली पाटील यांची मैत्री चांगलीच गाजली. त्याबरोबरच सोनाली पाटीलने सोनी टीव्हीवरील ‘जुळता जुळता जुळतंय की’ मालिकेत काम केले आहे. तसेच वैजू नंबर १ या मालिकेत अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता अभिनेत्री एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
सोनाली पाटीलची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री
सोनाली पाटील लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर आई तुळजाभवानी या मालिकेत दिसणार आहे. आई तुळजाभवानी या मालिकेत अभिनेत्री राजा महिषासुराच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. शुंभा असे या पात्राचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या ‘आई तुळजाभवानी’ची गाथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ‘आई तुळजाभवानी’ची भूमिका अभिनेत्री पूजा काळे साकारत आहे. आता सोनाली पाटीलला या नव्या भूमिकेत पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहेत. आता तिच्या इतर भूमिकांप्रमाणेच अभिनेत्री या नव्या भूमिकेतूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, स्टार प्रवाहवरील ‘वैजू नंबर १ या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मात्र, बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्यानंतर अभिनेत्रीला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर सोनाली पाटीलने ‘योग योगेश्वर जय शंकर’ या टीव्ही मालिकेतही काम केले आहे. अभिनयाबरोबरच सोनाली पाटील सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या संपर्कात असल्याचे दिसते. सोशल मीडियावर ती विविध व्हिडीओ शेअर करीत असते. चाहत्यांबरोबर अनेक गोष्टी शेअर करत असते. त्याबरोबरच अभिनेत्री बिग बॉस मराठीच्या इतर सीझनमधील स्पर्धकांबद्दल व्यक्त होताना दिसली होती. बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू असताना तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पर्धकांच्या खेळावर वक्तव्य केले होते. नुकतीच सोनाली पाटीलने बिग बॉस मधील मैत्रीण मीनल शाहच्या लग्नात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. सोनलने मीनलच्या लग्नातील फोटो व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
दरम्यान, आता सोनाली पाटीलला आई तुळजाभवानी मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. याबरोबरच अभिनेत्री जयभीम पँथर या चित्रपटातदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ११ एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.