सध्या छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस हिंदी आणि बिग बॉस मराठी हे दोन्हीही कार्यक्रम चांगलेच गाजताना दिसत आहे. या कार्यक्रमातील टास्क, नॉमिनेशन, राडे, भांडण याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉसची सर्वच पर्व लक्षवेधी ठरताना दिसत आहे. बिग बॉस कार्यक्रमाद्वारे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून अभिजित बिचुकलेला ओळखले जाते. तो सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. अभिजीत बिचुकलेने मी बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे.
अभिजीत बिचुकलेला स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणून ओळखले जाते. तो नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत. अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस’ मराठी सिझन २ मधील स्पर्धक म्हणूनही ओळखले जाते. तो काही वर्षांपूर्वा बिग बॉस हिंदीमध्येही सहभागी झाला होता. नुकतंच अभिजीत बिचुकलेने न्यूज १८ लोकमतशी संवाद साधला. यावेळी त्याने बिग बॉस कार्यक्रमातील वाईल्ड कार्ड एंट्रीबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : ‘बिग बॉस १५’ मध्ये एण्ट्री घेणारे अभिजीत बिचुकले नेमके कोण? जाणून घ्या त्यांच्या संपत्तीविषयी
काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी आणि हिंदीचे नवीन सिझन सुरु झाले. तुम्ही हे बघता का? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाले, “मला कामाच्या व्यापामुळे बिग बॉस पाहायला जमत नाही. पण बिग बॉसच्या घरात सध्या काय चाललंय, हे मी वेगवेगळ्या सोशल मीडियाद्वारे फॉलो करत असतो. माझं मराठी बिग बॉसपेक्षा हिंदी बिग बॉसवर जास्त आणि विशेष लक्ष असते.”
“बिग बॉस हिंदीमध्ये सध्या अनेक गोष्टी घडत आहे. यात सिमबुल ही सर्वात कमी वयाची स्पर्धक असली तरी ती चांगली खेळत आहे. तर अब्दु या विदेशी स्पर्धकाच्या कमी उंची आणि स्वभावामुळे त्याच्याबद्दल उत्सुकता आहे. मराठी बिग बॉस स्पर्धेचा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदीमध्ये आहे. तो माझा खूप चांगला मित्र आहे. तो माझ्याशी ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन चांगला वागतो. त्याला माझ्याकडून शुभेच्छा”, असेही अभिजीत बिचुकले म्हणाले.
आणखी वाचा : “मी बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन…” अभिजीत बिचुकलेने महेश मांजरेकरांना दिले थेट चॅलेंज
“मी गेल्या हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेतली होती. त्यामुळे कार्यक्रमात धमाल पाहायला मिळाली. जर यंदा मला आयोजकांनी संधी दिली तर मला जायला आवडेल. मराठी आणि हिंदी दोन्हीही बिग बॉसच्या पर्वांना हवा असलेला तडका द्यायला मी तयार आहे. तो मी नक्की देईन. ‘तुमने पुकारा और हम चले आये”,’ असे म्हणतं अभिजीत बिचुकलेंनी वाईल्ड कार्डद्वारे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी तयार असल्याचं सांगितले आहे.