‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या विकास सावंतने त्याच्या उत्कृष्ट खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. सुरुवातीला अतिशय शांत असलेल्या विकासने टास्कदरम्यान आक्रमकता दाखवत घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही त्याच्या खेळाची दखल घ्यायला भाग पाडली होती. परंतु, बिग बॉसच्या घरातील त्याचा प्रवास अर्ध्यावरच संपला.
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच विकास सावंतने ऑलिम्पिकची तयारी सुरू केली आहे. थाळी फेक खेळात विकासला सहभाग घ्यायचा आहे. काही दिवसांपूर्वी विकासने समुद्रकिनाऱ्यावर थाळी फेकचा सराव करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमधून त्याने ऑलिम्पिकसाठी तयारी करत असल्याचं सांगितलं होतं.
हेही वाचा>>“सनी लिओनी…”, हटके पोझमध्ये फोटोशूट केल्यामुळे सई ताम्हणकर ट्रोल
विकास सावंतने ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची इच्छा ‘ईटाइम्स टीव्ही’शी बोलताना व्यक्त केली. तो म्हणाला, “मी एक ठेंगणा व्यक्ती आहे. माझी उंची कमी आहे. पण मला ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायचं आहे. माझी ताकद व क्षमता प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीच्या घरात पाहिली आहे. आता माझं ध्येय ऑलिम्पिक आहे. मला त्यावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करुन मला संपूर्ण जगाला माझ्या ताकदीचं प्रदर्शन द्यायचं आहे”.
हेही वाचा>> मुंबईच्या ट्राफिकबाबत अक्षया देवधरची पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली “आता शेंगदाणे विकू…”
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याबरोबरच विकासने दिग्दर्शक होण्याची इच्छाही बोलून दाखवली. “दिग्दर्शक होण्याचीही माझी इच्छा आहे. ठेंगण्या व्यक्तींच्या लव्ह स्टोरी लोकांनी पाहिलेल्या नाहीत. अशा व्यक्ती प्रेमात कशा पडतात, हे मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे”, असंही विकासने सांगितलं. विकास एक उत्कृष्ट डान्सर आहे. डान्सचे अनेक व्हिडीओ तो सोशल मीडियावरुन शेअर करत असतो.