बिग बॉसच्या घरामध्ये भांडण, वाद, मारामाऱ्या अशा गोष्टी नेहमी पाहायला मिळतात. शुल्लक कारणापासून ते बिग बॉस यांनी दिलेल्या टास्कपर्यंत कोणत्याही गोष्टीवरुन या घरातील सदस्य एकमेकांशी भांडू शकतात. चढाओढीचा हा स्पर्धकांचा खेळ हळूहळू रंगत आहे. यामुळे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाबद्दल चर्चा रंगल्या आहेत. घरातला कोणता गट दुसऱ्या गटावर भारी पडतोय याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.
नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. अभिनेता जितेंद्र जोशीने बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. घरामध्ये गेल्यावर तो सदस्यांना “आपल्याला आता एक गेम खेळायचा आहे..टारगेट टास्क” असं म्हणत एक टास्क करायला लावतो. या टास्कमध्ये एक सदस्य हातामध्ये पाण्याने भरलेला फुगा घेऊन टारगेटसमोर उभ्या असलेल्या सदस्यावर फेकतो असे व्हिडीओमध्ये दिसते.
टास्क संपल्यावर अमृता धोंगडे जितेंद्रला “तुम्हाला वाटतं तर तुम्ही पण एक मारा..” असे म्हणते. त्यावर जितेंद्र सर्व घरच्यांना संबोधून “मी जे काही खेळायचे आहे, ते नंतर तुमच्याबरोबर खेळणार आहे.. त्याच्यापुढे हे काहीच नाही! तो मार असा बसणार आहे..” अशी प्रतिक्रिया देतो. ते ऐकून घरामधले सर्व स्पर्धेक एकमेकांकडे पाहायला लागतात. जितेंद्रच्या या वक्तव्याने आता कार्यक्रमामध्ये नवीन काय घडणार आहे याबाबतची उत्सुकता चाहत्यांना आहे.
रविवारच्या भागामध्ये महेश मांजरेकर यांच्यासह जितेंद्र जोशी या कार्यक्रमामध्ये दिसला होता. आज त्याचा ‘गोदावरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्याने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या चित्रपटाची निर्मितीही त्याने केली आहे. जितेंद्रसह संजय मोने, नीना कुलकर्णी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव आणि विक्रम गोखले या कलाकारांनी काम केले आहे.