‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या पर्वामध्ये स्पर्धकांमध्ये असलेली मैत्री, वाद, भांडण, राडे पाहायला मिळत आहेत. किरण माने व विकास सावंत हे दोघं तर पर्वाच्या सुरुवातीपासूनच एकत्र आहेत. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनीही पसंती दिली. विकास व किरण एकमेकांना उत्तम साथ देताना दिसले. पण एका टास्कदरम्यान विकासने किरण यांना चक्क गद्दारच म्हटलं.
विकासने किरण यांना गद्दार टॅग दिल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्यानंतर किरण विकासवर नाराज असल्याचं दिसलं. “जा माझे तिकडे शत्रू एकटे बसले असतील जा त्यांच्याबरोबर गप्पा मारत बस. तुला ‘बिग बॉस’ कोणी खेळायला शिकवलं? कोणी कुत्रं विचारत नव्हतं तेव्हा तुला कोणी विचारलं? एक कानाखाली द्यायला पाहिजे होती तुझ्या.” असं किरण माने विकासला बोलताना दिसले.
आता विकास-किरण यांच्यामधील वाद संपला असल्याचं पाहायला मिळत आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये किरण विकासला घरातील इतर सदस्यांबाबत भडकवताना दिसत आहेत. किरण बोलतात, “माणसं समोर येऊन बोलतात ते खरं नसतं. ती (अपूर्वा नेमळेकर) समोर येऊन बोलते असं मला तू सांगतोस. अक्षय काय बोलला तुला की तू टॉप तीनमध्ये आहेस. नंतर तोच काय बोलला विकास मला या खेळामध्ये नको आहे.”
यावर विकास किरण यांना बोलतो, “टास्कमध्ये गोड मस्का लावते मला अपूर्वा हे मला माहित आहे. तुम्ही मला बोलता तिला टाळ मी तेच करत आहे.” किरण म्हणतात, “रोहित प्रसाद, अक्षय, अमृता देशमुखबरोबर बोल पण तिला तू दहा वेळा टाळलं तर अकराव्या वेळी ती तुझ्याकडे येणार आहे का? दोनच व्यक्ती घरामध्ये आहेत ज्यांच्याशी संबंध ठेवू नकोस. एक अपूर्वा जिच्यामुळे तू मला गद्दार ठरवलं. आणि दुसरी स्नेहलता जिला बाहेर लोक थू थू करतात. या दोघींशी जर तुला संबंध ठेवायचे असतील तर तू माझ्याशी संबंध ठेवू नकोस.” किरण यांचं हे वागणं पाहून प्रेक्षक मात्र त्यांच्यावर संतापले आहेत. किरण माने अपूर्वाला घाबरत आहे, विकासला किरण माने चुकीचं मार्गदर्शन करत आहे असं प्रेक्षक म्हणत आहेत.