बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. नुकताच या पर्वाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला असून यंदाच्या या पर्वासाठी तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, यशश्री मसुरकर, अमृता देशमुख, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, रोहित शिंदे यांनी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी किरण माने आणि एअरटेल विजेता स्पर्धक त्रिशूल मराठे यांच्यात एका टास्कवरून वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं.

बिग बॉसने पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांपैकी चार सदस्य बाहेर जाणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर सदस्यांना एक टास्क देण्यात आला होता. बिग बॉसच्या घरात एंट्री करताना सदस्यांना निळा, पिवळा, लाल आणि जांभळा अशा रंगांचे बॅण्ड देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार सदस्य चार गटात विभागले गेले आहेत. या चार गटांतील सदस्यांनी मिळून आपल्यापैकी एका सदस्याचं नाव सर्वात निरुपयोगी सदस्य म्हणून द्यावं असा टास्क देण्यात आला. यावेळी त्रिशूल मराठे आणि किरण माने यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi 4 : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही…” बिग बॉसच्या घरात महेश मांजरेकरांचं वक्तव्य

बिग बॉसच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात सदस्य एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत. कोणाचं नाव निरुपयोगी सदस्य म्हणून द्यावं याविषयी ते एकमेकांशी बोलत आहेत. अशात त्रिशूल मराठे त्यांच्या गटातून किरण माने यांचं नाव देण्याचं सुचवतो. त्यावेळी तो म्हणतो, “मला वाटतं किरण सर, कारण बाकी आम्ही सर्व तरुण आहोत.” त्यावर लगेचच किरण माने त्याला, “अरे मग मी काय म्हातारा आहे काय?” असं उत्तर देताना दिसत आहेत.

आणखी वाचा-Bigg Boss Marathi 4 : “इंडस्ट्रीतल्या काही कारस्थानी लोकांनी…” बिग बॉसच्या घरात एंट्री घेताच किरण मानेंची फटकेबाजी

दरम्यान आता किरण माने आणि त्रिशूल यांच्यात पुढे काय होणार हे आगामी एपिसोडमध्येच समजणार आहे. पण यंदाचं पर्व ‘ऑल इज वेल’ थीमवर असलं तरी बिग बॉसच्या घरात कल्ला होणार हे मात्र निश्चित. टीव्ही विश्वातील सर्वात वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय अशी ओळख असलेला हा शो आता पुढचे तीन महिने प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन करणार हे नक्की आणि याची झलक पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली आहे.

Story img Loader