छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त तरीही लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’ला ओळखले जाते. आज रविवार २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित असणार आहे. याचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे. बिग बॉसच्या घरात प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी एंट्री केली आहे आणि एंट्री करताच त्यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.
अभिनेते किरण माने यांनी बिग बॉसच्या घरात दमदार एंट्री केली आणि घरात एंट्री करताच त्यांनी मराठी टीव्ही जगतातील लोकांना पुन्हा एकदा टोला लगावला. बिग बॉसच्या घरात एंट्री घेताच त्यांनी सुरुवातील बिग बॉसचे आभार व्यक्त केले आणि त्यानंतर ते म्हणाले, “इंडस्ट्रीतल्या काही कारस्थानी लोकांनी माझ्यावर अन्याय केला. मला स्क्रीनपासून वंचित ठेवलं होतं. माझा कॅमेरा हिरावून घेतला होता. ६ महिने माझा जीव तडफडत होता. आज माझ्यासाठी अडीचशे कॅमेरे लावलेत बिग बॉसनी माझ्यासाठी. या किरण मानेसाठी. धन्यवाद बिग बॉस खूप छान वाटतंय.”
आणखी वाचा- Bigg Boss Marathi 4 Grand Premiere Live : ‘शेवंता’ फेम अपूर्वा नेमळेकर ‘बिग बॉस’ मराठीमध्ये होणार सहभागी, वाचा संपूर्ण यादी
किरण माने यांनी काही महिन्यांपूर्वी राजकीय मतं मांडत असल्याच्या मुद्द्यावरून ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप निर्मात्यांवर केला होता आणि त्यानंतर हा वाद सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. मालिकेतील कलाकारांनी किरण मानेंच्या विरोधात भूमिका घेतली होती. तर टीव्ही जगतातील काही लोकांनी मात्र किरण मानेंची पाठराखण केली होती.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची थीम ‘ऑल इज वेल’ अशी आहे. यापूर्वी एक प्रोमोमध्ये होस्ट महेश मांजरेकर यांनी या पर्वात भांडणं, गोंधळ नसणार असं म्हटलं होतं. पण बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पडायला फारसा वेळ लागत नाही हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण यावेळी हे स्पर्धक प्रेक्षकांना काय वेगळं मनोरंजन कसं काय करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. किरण माने यांच्या फटाकेबाजीनंतर पुढे काय होणार याची कल्पना प्रेक्षकांना आलीच असेल. त्यामुळे पुढेच १०० दिवस प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन होणार हे नक्की.
आणखी वाचा-“मला संपवायला निघालेल्यांचा ६ महिन्यात…”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान आतापर्यंत बिग बॉस मराठीच्या घरात आतापर्यंत तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर यांनी एंट्री केली आहे. बिग बॉस मराठी ४ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. तर आठवड्याअखेर म्हणजेच वीकेंडला शनिवार आणि रविवारी ९.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. ज्यात होस्ट महेश मांजरेकर आपल्या अनोख्या स्टाइलमध्ये स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहेत. याशिवाय हा शो तुम्हाला वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहे.