टीव्ही जगतातील सर्वात वादग्रस्त पण तरीही लोकप्रिय शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. काही वर्षांपूर्वीच हा शो आपल्या मराठी भाषेतही सुरू झाला आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रियही ठरला आहे. आजपासून या शोचं चौथं पर्व सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे. भांडणं असणार नाहीत असं बोललं जातंय त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत एक वेगळीच उत्सुकता आहे.
बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘ऑल इज वेल’ थीमवर आधारित असलेल्या या पर्वाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. या पर्वामध्ये कोणते कलाकार दिसणार याबाबत कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही. पण सोशल मीडियावर अपूर्वा नेमळेकर, नेहा खान, समीर परांजपे, किरण माने, सायली संजीव, हार्दिक जोशी या कलाकारांची नावं चर्चेत आहेत.
आणखी वाचा- चाळ संस्कृतीची थीम असलेल्या ‘बिग बॉस’च्या घराची खास झलक
बिग बॉस मराठी ४ चा प्रीमयर आज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. त्यानंतर पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. बिग बॉस मराठी ४ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. तर आठवड्याअखेर म्हणजेच वीकेंडला शनिवार आणि रविवारी ९.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. ज्यात होस्ट महेश मांजरेकर आपल्या अनोख्या स्टाइलमध्ये स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहेत. याशिवाय हा शो तुम्हाला वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहे.
दरम्यान मागच्या काही दिवसांपासून या शोचे प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ज्यात बिग बॉसच्या स्पर्धकांची झलक दाखवण्यात आली आहे मात्र त्यांचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे या पर्वात कोणते कलाकार कल्ला करताना दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अद्याप कायम आहे.