‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. राखी सावंतसह आणखीन तीन नव्या सदस्यांनी घरामध्ये एन्ट्री केली आहे. राखीने घरात प्रवेश करताच वादाला सुरुवात केली आहे. डायलॉग बाजी करत तिने घरात प्रवेश केला. त्यानंतर तेजस्विनी लोणारी व विशाल निकम यांच्याबरोबर ती वाद घालताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर घरामध्ये काम करणार नसल्याचं राखीचं स्पष्ट मत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी राखीने एक मुलाखत दिली. यामध्ये तिने ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये जाण्याचंही कारण सांगितलं. शिवाय घरात जाण्यापूर्वीच आपण काम करणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.
राखी म्हणाली, “मी माझ्या घरी खूप काम करते. अहो घरातील भांडी घासून घासून माझ्या हातावरची लक्ष्मण रेषा गेली. घरी पण भांडी घासू आणि ‘बिग बॉस’च्या घरामध्येही भांडी घासू का मी? म्हणून माझं लग्नही होत नाही.”
“आता मी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये काहीच काम करणार नाही. खूप मेकअप करणार, चांगले चांगले कपडे परिधान करणार व दागिने घालणार आणि फक्त बसून राहणार. हिंदी ‘बिग बॉस’नंतर मी मराठी ‘बिग बॉस’मध्ये आली आहे. आता मला थोडातरी आराम नको.” राखी आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये काय काय राडे घालणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.