‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. या सीझनमध्ये चार वाईल्ड कार्ड एन्ट्रीही झाल्या. तर दुसरीकडे घरातील सदस्य तेजस्विनी लोणारीला दुखापतीमुळे हा खेळ अर्ध्यावर सोडावा लागला. त्यानंतर तेजस्विनीचे चाहतेही निराश झाले होते. आता तिने स्वतः एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरुन तेजस्विनी पुन्हा ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
तेजस्विनीने पोस्ट शेअर करत म्हटलं की, “माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनो तुम्ही खूप मजेत असाल अशी मी अपेक्षा करते. माझ्या तब्येतीची विचारपूस करणारे अनेक संदेश मला तुमच्याकडून मिळाले. माझ्या बोटाची शस्त्रक्रिया झाल्याचा गैरसमज अनेकांना होत असल्याचे मला समजलं.”
“मुळात, तसं काहीही झालं नाही. माझ्या हाताला किरकोळ फ्रॅक्चर झालं असून, ते काही आठवड्यात भरून निघेल. त्यामुळे शस्त्रक्रियेची गरज नाही असं माझ्या डॉक्टरांनी सांगितलं. आता तीन आठवडे झाले असून बऱ्यापैकी सुधारणादेखील होत आहे. लवकरच एकदम तेजस्वी तेजस्विनी तुम्हाला परत एकदा दिसून येईल. तुमचं माझ्यावरच प्रेम असंच राहू द्या.” तेजस्विनीच्या या पोस्टनंतर ती ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आणखी वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या मुख्य कलाकाराची मालिकेमधून एक्झिट, अभिनेत्री नंदिता पाटकर म्हणते, “आगाऊ माणूस…”
तेजस्विनीच्या या पोस्टवर चाहत्यांनीही विविध कमेंट केल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये तू पुन्हा येशील असा विश्वास आहे, आम्ही वाट पाहत आहोत, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात लवकर परत ये, ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये पुन्हा ये, ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये कमबॅक कधी करणार? अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. आता खरंच तेजस्विनी ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये पुन्हा येणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे