‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा अक्षय केळकर विजेता ठरला. अपूर्वा नेमळेकरबरोबर असलेली त्याची मैत्री तर चर्चेचा विषय ठरली. ‘बिग बॉस’च्या पहिल्या दिवसापासूनच अक्षय चर्चेत होता. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हातात आल्यानंतर तो अगदी भारावून गेला आहे. दरम्यान अक्षयचं त्याच्या घरी जोरदार स्वागत करण्यात आलं.
आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरलेल्या अक्षयला ट्रॉफी बरोबरच १५ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम मिळाली. शिवाय अक्षय अगदी मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे बाबा स्वतः रिक्षाचालक आहेत. याबाबत त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. आता त्याचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ
अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय स्वतः बिग बॉसची ट्रॉफी घेऊन रस्त्यावर नाचताना दिसत आहे. तर अक्षयच्या घरातील मंडळीही या मिरवणूकीमध्ये दिसत आहेत. शिवाय त्याचे मित्र-मंडळीही ट्रॉफी हातात घेऊन नाचत आहेत.
मुंबईत अक्षयची जेव्हा मिरवणूक काढण्यात आली तेव्हा त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. आपल्यावर सगळ्यांचं असणारं प्रेम पाहून अक्षय अगदी भारावून गेला होता. अक्षयने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, “मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. माझे बाबा रिक्षाचालक आहेत. मला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून मी कुटुंबासाठी घर विकत घेणार आहे”. अक्षय आता त्याच्या कुटुंबियांचीही स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे.