सध्या Bigg Boss Marathi 5 चे पर्व विविध कारणांनी चर्चेत आहे. पहिल्याच आठवड्यात जे गट पडले होते, त्यांमध्ये या पाचव्या आठवड्यात फूट पडलेली दिसली. निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. आता समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये आर्या अरबाजसाठी भावुक झालेली दिसत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अरबाज आणि आर्या यांच्यामध्ये संभाषण सुरू आहे. या संभाषणात आर्या अरबाजसाठी भावुक झालेली असून ती अरबाजला निक्कीबरोबरच्या नात्यावर सल्ला देताना दिसत आहे.
काय म्हणाली आर्या?
व्हिडीओच्या सुरुवातीला आर्या अरबाजला म्हणते, “मी तुझ्या परिस्थितीतून गेले आहे, तू असं नको करू. तुला बोलायचं असेल तर तू बोल. तिच्याशी सगळं स्पष्ट कर. अरबाज आज तू सगळे प्रयत्न करून रात्री तिच्याशी बोल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, याच्यानंतरही जर तिने कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुझ्याविषयी भावना दाखवल्या तर तू हे ठरव की तू तिला हे सांगायला जाणार नाहीस की तू असं करू नको. कारण जेवढं आपण तिला हे सांगतो की हे नको करू, ते ती अजून करते.” तिच्या या बोलण्यावर अरबाज सहमती दर्शवत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कंमेट करत लिहिले, “आर्याने तर सगळेच रंग दाखवले.” तर काही नेटकऱ्यांनी निक्कीच्या खेळाचे कौतुक केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
चौथ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने निक्कीला, “तुम्ही हलक्या कानाचे आहात. घरातील इतर सदस्य तुम्हाला चालवतात तसे तुम्ही चालता”, असे म्हटले होते. महत्त्वाचे म्हणजे ती ज्या टीम ए मध्ये होती, त्याच टीममधील अरबाज, वैभव, जान्हवी, घन:श्याम हे तिच्या पाठीमागे तिच्याविषयी काय बोलतात, याचे व्हिडीओ दाखवले होते. त्यानंतर निक्कीने टीम ए मधील कोणत्याही सदस्याला ट्रॉफी उचलू देणार नाही, असे म्हटल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर अरबाज, वैभव, जान्हवी यांच्याबरोबर तिची भांडणे झाल्याचे पाहायला मिळाले. अरबाज आणि निक्की यांच्यामध्ये दुरावा आल्याचे गेल्या काही भागात दिसले.
आता येणाऱ्या पुढील काळात बिग बॉसच्या घरातील समीकरणे कशी बदलणार, कोण कोणाबरोबर ठाम राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार आणि कोणत्या सदस्याला शाबासकीची थाप देणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.