Bigg Boss Marathi 5 चे स्पर्धक सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. हे स्पर्धक जे या घरात बोलतात, वागतात त्याचे पडसाद बाहेरच्या जगावर पडतात. त्यांनी बिग बॉसच्या घरात केलेल्या गोष्टींची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. त्यामुळे हे स्पर्धक जेव्हा या शोमधून बाहेर पडतात, त्यानंतरही चर्चांचा भाग बनतात. आता बिग बॉस मराठी ५ मधील स्पर्धक आर्या जाधव ही चर्चेत आली आहे.

काय म्हणाली आर्या?

आर्या जाधवने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने बिग बॉस मराठी ५ च्या घरातील सदस्यांचे एका शब्दात वर्णन केले आहे. तिने वर्षा उसगांवकरांना ‘मम्मा’ असे म्हटले आहे. पंढरीनाथ कांबळे ‘हुशार’, वैभव चव्हाण हा ‘एक चांगला मित्र’, योगिता ‘खरी’, अरबाज पटेल तो ‘जसे दाखवतो तसा नाही’, धनंजय पोवारचे ‘खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे’, निक्की ‘वेडी’ आहे, तर अंकिता वालावलकर ‘स्मार्ट’ आहे. सूरजबद्दल बोलताना तिने म्हटले, तो खरा आहे. असे म्हणत तिने बिग बॉस मराठी ५ च्या घरातील सदस्यांचे वर्णन केले आहे.

आर्या जाधव सध्या मोठ्या चर्चेत आहे. बिग बॉसने सदस्यांना जादुई हिऱ्याचा टास्क दिला होता. त्यावेळी निक्की आणि आर्यामध्ये झटापट झाली. या भांडणात आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली होती, त्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. निक्कीने मी हे सहन करू शकत नाही. एकतर तिला बाहेर काढा किंवा मला बाहेर काढा, अशी मागणी बिग बॉसकडे केली होती. त्यानंतर आर्याला तात्पुरती बिग बॉसच्या घरातील तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली होती, तर भाऊच्या धक्क्यावर तिला घरातून निष्कासित केले होते.

हेही वाचा: ‘ताई’ नव्हे तर…! मंगेश देसाई निर्मिती सावंत यांना ‘अम्मीजान’ अशी हाक का मारतात? सांगितला भावुक किस्सा

आता बिग बॉस मराठीचे ५ वे पर्व ७० दिवसांत संपणार आहे. सध्या घरात आठ स्पर्धक आहेत. वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर हे स्पर्धक आहेत. हे आठही स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी कोण आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.