Bigg Boss Marathi 5 व्या पर्वात ज्यांच्या मैत्रीची सर्वत्र चर्चा होताना दिसत होती, ते स्पर्धक म्हणजे अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी हे आहेत आता कडाक्याचे भांडण झाल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे निक्कीने केलेल्या वक्तव्यामुळे अभिजीत आणि अंकितामध्येदेखील वाद होताना दिसत आहेत.
नेमकं घडलं काय?
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अभिजीत सोफ्यावर बसला असून, तिथे धनंजय, निक्की, अंकिता आणि इतर सदस्य आहेत. अभिजीत म्हणतो, “जान्हवीचा आणि नॉमिनेशनचा काय संबंध? मी माझं नाव वाचवायचं नाही का?” त्यावर निक्की म्हणते, “तुला जान्हवी तुझ्या टीममध्ये पाहिजे होती ना? मग तू अंकिताला समजावून सांगायला पाहिजे होतंस की, तू जान्हवीला नॉमिनेट करू नकोस. तू म्हटलं होतंस की, जान्हवी मला माझ्या ग्रुपमध्ये हवी आहे.” त्यावर अभिजीत म्हणतो, “ते माझं मी बघेन. त्या गोष्टी वेगळ्या आहेत.”
अंकिता म्हणते, तू असं काय काय म्हणून ठेवलंय ते एकदाच सांग.” त्यावर चिडलेला अभिजीत म्हणतो, “तू थोडं तरी समज या गोष्टींना. माझ्यावर येऊ नको. ती येऊन गेली की, तू माझ्यावर येत जा. तिचं कशाला घेऊन बसतेस तू? स्वत: काय केलं ते बघ एकदा.” अंकिता म्हणते, “मी माझं बरोबर केलंय” अभिजीत म्हणतो, “तुला वाटतंय ना तर मग आमच्यावर येऊ नको. आम्हीपण आमचं बरोबर करतोय. मी आणि ती आमचं बघून घेऊ.”
या भांडणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “निक्की बी टीममध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करते आहे आणि अंकिता नेहमी त्याला बळी पडते.” दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले, “जोड्यांच्या टास्कमध्ये अभिजीतनं तिला चांगल्या मनानं दिलेले सल्ले आता ती त्याच्याच विरोधात वापरत आहे.” तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “निक्की नॉमिनेट झाली की, अशी वागते.”
हेही वाचा: ‘प्रेमाची गोष्ट’ला टाकलं मागे! ‘बिग बॉस मराठी’ची ऑनलाइन TRP मध्ये मोठी झेप; पाहा संपूर्ण यादी…
बिग बॉसने घरातील सदस्यांना नॉमिनेशनचा टास्क दिला होता. या टास्कमध्ये एका सदस्याला दुसऱ्याचा असे फोटो दिले होते. ज्या स्पर्धकाच्या गळ्यात ज्या व्यक्तीचा फोटो असेल, त्याने त्याला नॉमिनेशनपासून वाचवायचे. त्यासाठी प्रत्येकाला एक जादुई दिवा दिला होता. तो समोर असलेल्या दगडावर नेऊन ठेवायचा होता. जो दिवा दगडावर ठेवू शकणार नाही, त्याच्याकडे ज्याचा फोटो असेल तो नॉमिनेशनमध्ये जाणार. जो सदस्य पोहोचणार नाही, त्याने त्याच्याकडे ज्या व्यक्तीचा फोटो असेल त्याला का नॉमिनेट करत आहोत, याचे योग्य ते कारण द्यायचे, असे एकंदरीत या खेळाचे स्वरूप होते. संग्राम चौगुले या टास्कचा संचालक होता.
या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी, वैभव, निक्की, अभिजीत, आर्या, वर्षा उसगांवकर, अंकिता हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
आता निक्की आणि अभिजीत यांच्या मैत्रीवर याचा काय परिणाम होणार? त्यांची मैत्री पुढेदेखील तशीच राहणार का? या आठवड्यात आणखी कोणता कल्ला होणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.