इंडियन आयडॉलचा विजेता ते चित्रपटात गायलेली गाणी आणि आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सामील झाल्याने अभिजीत सावंत मोठ्या चर्चेत आहे. काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात ज्या प्रकारे त्याचा वावर आहे, त्याविषयी प्रेक्षक सोशल मीडियावर बोलताना दिसत आहेत. आता मात्र अभिजीत सावंतने एका मुलाखतीदरम्यान केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला अभिजीत सावंत?

अभिजीत सावंतने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली होती. यावेळी त्याने बोलताना म्हटले, “मला नेहमी असं वाटायचं की, माझ्यासमोरचे जे लोकं आहेत, माझ्यासाठी निर्णय घेणारे ते उत्तम लोक आहेत. कारण- त्यावेळी काहीच माहीत नव्हतं. कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नव्हतं. मला एका खूप मोठ्या चित्रपटातील गाण्याची ऑफर मिळाली होती. खूप मोठ्या अभिनेत्याची ती डेब्यू फिल्म होती आणि त्याच्यासाठी माझ्या आवाजाची निवड झाली होती. मला त्या अभिनेत्यासाठी गायचं होतं. पण, दुसऱ्या दिवशी इंडियन आयडॉल-२ चा अंतिम सोहळा होता. तर मला प्रश्न पडला की नक्की कुठे जाऊ, या प्रश्नात मी अडकलो होतो.

पुढे बोलताना तो म्हणतो, “आता माझ्यासाठी निर्णय घेत होती, ती काही माझी जवळची माणसं नव्हती. माझा भाऊ किंवा कुटुंब नव्हते, जे माझ्यासाठी विचार करतील. ते बिझनेसमध्ये होते; भलेही ते माझे मॅनेजर असले किंवा सल्ले देणारे असले तरीही ते काम करणारे होते. ते म्हणाले की, अरे काही नाही. नंतर मी त्यांना फोन करून सांगेन, तू इकडे चल. आता ज्यांनी गाणे ऑफर केले होते, त्यांचा इगो वेगळा. मी याला एवढी मोठी संधी देतोय आणि हा आला नाही. याला अ‍ॅटिट्यूड आहे. याला सोडा आपण दुसऱ्याला घेऊ. माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय दुसरे घेत होते आणि जज मला केलं जात होतं.”

हेही वाचा: IC-814: The Kandahar Hijack: कंदहार हायजॅक वेबसीरीजमध्ये अतिरेक्यांची हिंदू नावे; वाद उफाळल्यानंतर नेटफ्लिक्सनं दिलं उत्तर

अभिजीत सावंत हा इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता होता. त्यावेळी त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुकही झाले.

आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्यापासून अभिजीत पुन्हा एकदा मोठ्या चर्चेत आला आहे. ज्या पद्धतीने तो इतर सदस्यांबरोबर बोलतो, वागतो आणि आपला खेळ दाखवतो, निर्णय घेतो, त्यामुळे प्रेक्षकांची त्याच्या खेळाला पसंती मिळताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनेदेखील त्याच्या खेळाचे कौतुक केले होते. आता बिग बॉसच्या घरात त्याची पुढील वाटचाल कशी असणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 abhijeet sawant feels regret about career decision took by others people judge him nsp