Bigg Boss Marathi 5 मधून पंढरीनाथ कांबळे हा नुकताच बाहेर पडला आहे. बिग बॉसच्या शोमधून बाहेर आल्यानंतर मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. घरातील सदस्य, खेळ, त्याचा स्वत:चा बिग बॉसमधील प्रवास यांविषयीदेखील वक्तव्य केले आहे. मी स्वत:ला टॉप ५ मध्ये बघत होतो, असे त्याने म्हटले आहे.
काय म्हणाला पंढरीनाथ कांबळे?
बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर पंढरीनाथ कांबळेने ‘कलाकट्टा’ला मुलाखत दिली. मुलाखतीत तो म्हणाला, “मला खात्री होती की, मी इतक्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही. मी एलिमिनेट होणार नाही. अंकिता, जान्हवी, धनंजय व मी असे आम्ही जेव्हा चौघे टास्क रूममध्ये गेलो होतो. आधी वाटले की, धनंजय जाईल; पण तो सेफ झाला. पण, नंतर वाटलं की, जान्हवी जाईल, तर जान्हवी सेफ झाली. मग मी व अंकिता उरलो होतो. त्यावेळी मला तर जायची इच्छा नाही, अंकिताही जाऊ नये, असं वाटत होतं. पण, नंतर विचार केला, जो कोणी जाईल, तो आनंदाने घराबाहेर जाईल. कारण- तिच्या चेहऱ्यावरदेखील भीती नव्हती. ती भीती जान्हवीच्या चेहऱ्यावर दिसलेली. ज्यांनी चुका केलेल्या असतात, त्यांच्या मनात भय असतं. जे योग्य वागले आहेत, त्यांच्या मनात कोणत्याच गोष्टीचं भय नसतं. आमच्या दोघांच्याही मनात कोणतीही भीती नव्हती.”
पुढे बोलताना पंढरीनाथ कांबळेने म्हटले, “एवढ्या लवकर वाटलं नव्हतं की, मी बाहेर येईन. मी स्वत:ला टॉप ५ मध्ये बघत होतो. पण ठीक आहे, बिग बॉसने जो निर्णय दिला, तो मान्य आहे. मी ज्या प्रकारे गेम खेळलो, त्यासाठी मी आनंदी आहे. मी जसा गेलो होतो, तसाच परत आलो आहे, माझ्यामध्ये थोडासुद्धा बदल झालेला नाही.”
बिग बॉसच्या घराबद्दल बोलताना त्याने म्हटले, “काही दिवस अजून बिग बॉसचे घर मनात असणार आहे. सलग इतके दिवस एका ठिकाणी होतो. तीच तीच लोक सतत डोळ्यांसमोर होती, त्यामुळे इतक्या लवकर विसरता येणार नाही आणि पुढील काही वर्षांतसुद्धा याचा विसर पडणार नाही. जेव्हा जेव्हा बिग बॉसचा विषय निघेल तेव्हा तेव्हा माझ्या दृष्टिकोनातून पाहिलेले बिग बॉसचे घर आठवत राहील.”
दरम्यान, पंढरीनाथ कांबळेने घरातील सदस्यांविषयी परखडपणे आपले मत मांडल्याचे पाहायला मिळाले.