Bigg Boss Marathi 5 वे पर्व सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. सध्या घरात टीम ए च्या सदस्यांमध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे. याबरोबरच निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. दोघांमध्ये मोठी भांडणे झालेली गेल्या काही भागात दिसले होते. आता मात्र ‘कलर्स मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निक्की आणि अरबाज पुन्हा एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये निक्की आणि अरबाज एकमेकांशी संवाद साधत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अरबाजने मागितली निक्कीची माफी

व्हिडीओच्या सुरुवातीला, निक्की अरबाजला म्हणते, “तुला जर एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्याच्यासाठी रागात शब्द जपून वापरले पाहिजेत. जे खरं आहे ते दाखव लोकांना, उगाच स्वत:ला राक्षसासारखं दाखवू नकोस. तू बोलशील माझ्याकडे छत्तीस आहे, चल. हे करशील तू?” तिच्या या बोलण्यावर अरबाज तिला सॉरी म्हणताना दिसत आहे. त्यानंतर ते गळाभेट घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना कलर्स मराठीने, “तुटलेली मनं परत जुळणार, न सांगितलेलं मनातलं ओठांवर येणार!” अशी कॅप्शन दिली आहे.

कलर्स मराठी

आता निक्की आणि अरबाज यांच्यातील नाते पूर्ववत होणार का, पुढच्या खेळात ते एकमेकांबरोबर कसे राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच टीम ए मधील जान्हवी आणि वैभव यांना हे मान्य असेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चौथ्या आठवड्याच्या भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने सर्व सदस्यांची कडक शब्दात कानउघडणी केली होती. त्याबरोबरच, निक्की तांबोळीला तिच्याच ग्रृपमधील सदस्य ज्यांना ती मित्र मानते, ते तिच्या पाठीमागे तिच्याबद्दल काय बोलतात, याचे व्हिडीओ दाखवले होते. ते पाहिल्यानंतर निक्की तांबोळीने टीम ए मधील कोणत्याही सदस्याला ट्रॉफी घेऊ देणार नाही. असे म्हटले होते.

हेही वाचा: “प्रवीण तरडेंना लोकांनी कामाचे स्वातंत्र्य…”, ‘अहो विक्रमार्क्रा’ चित्रपटातील सहकलाकाराचे मोठे वक्तव्य

भाऊच्या धक्क्यानंतर टीम ए आणि निक्की यांच्यात मोठी भांडणे झालेली पाहायला मिळाली. एका भांडणात अरबाज पटेल घरातील वस्तूंची तोडफोड केल्याचे दिसले. आता व्हिडीओमध्ये दाखविल्याप्रमाणे, अरबाज आणि निक्की हे पुन्हा एकत्र गेम खेळणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.