Bigg Boss Marathi 5 चे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने स्पर्धकांची ज्याप्रकारे शाळा घेतली आहे, त्यामुळे सध्या ‘बिग बॉस’च्या शोची मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, आता बिग बॉसमधील एक व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे, या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या बिग बॉसच्या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ग्रुप बी एकत्र बसलेला असून त्यांच्यात वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे हा वाद निक्कीमुळे होत असल्याचे दिसत आहे.
निक्की तांबोळीमुळे टीम बीमध्ये होणार कल्ला
व्हिडीओमध्ये अंकिता वालावलकर धनंजय पोवारला निक्कीबरोबर त्याच्या झालेल्या संभाषणाबद्दल विचारत आहे. अंकिता धनंजयला विचारते, “तुम्ही निक्कीला जाऊन विचारलं की आर्या तुझ्याशी काय बोलली?” त्यावर धनंजयने “होय”, असे उत्तर दिले. का विचारलं? असं अंकिता विचारते. त्यावर धनंजय पोवार, “माझी मर्जी”, असे म्हणताना दिसत आहे. त्यावर अंकिता धनंजयला सांगत आहे, “निक्कीनेच आर्याला सांगितलं की, डीपीदादा मला येऊन असं असं विचारत होते; तर मागून कशाला विचारायचं, जे आहे ते समोरासमोर विचारलं पाहिजे.”
त्यावर धनंजय तिला सांगतो, “मी तिच्याकडे गेलो नव्हतो, ती माझ्याबरोबर कशा विषयावर तरी बोलत होती. त्यावेळी विषय निघाला. मग मी तिला विचारलं, आर्या आणि तुझ्यामध्ये इतक्या उशिरापर्यंत काय बोलणं झालं? एकमेकींना नागिणीसारख्या बघणाऱ्या तुम्ही दोघी जण, आज अचानक दोघीच बोलत बसल्या, म्हणून मला विचारावसं वाटलं, मी विचारलं. घरात कोणाशी बोलू याची मी तुमच्याशी चर्चा करू काय?”, असे धनंजय पोवार म्हणताना दिसत आहे. या चर्चेदरम्यान सूरज चव्हाण आणि आर्यादेखील तिथे बसलेले दिसत आहे.
बिग बॉसच्या पाचव्या पर्वात पहिल्या आठवड्यात घरात दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही गटात सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडणे होताना दिसतात. मात्र, चौथ्या आठवड्यातील भाऊचा धक्का या एपिसोडनंतर टीम एमध्ये फूट पडलेली दिसत आहे. टीम एमधील वैभव चव्हाण, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर हे निक्की तांबोळीच्या पाठीमागे तिला काय बोलतात, हे तिला भाऊचा धक्कामध्ये ऐकवले होते. त्यानंतर या सदस्यांना ट्रॉफी घेऊ देणार नाही, असे तिने म्हटले आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरातून इरिना रूडाकोवा बाहेर पडली आहे. आता या आठवड्यात बिग बॉसच्या घरात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.