‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘झापूक झुपूक’ आहे. महाअंतिम सोहळ्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लवकरच सूरजला घेऊन चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकांना सूरजच्या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. सूरज पाठोपाठ आता ‘बिग बॉस मराठी’मधील आणखी एक स्पर्धक चित्रपटात झळकणार आहे आणि हा स्पर्धक म्हणजे म्हणजे डीपीदादा अर्थात धनंजय पोवार (Dhananjay Powar).
आपल्या विनोदी स्वभावाने डीपीने महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर तो आई व बायकोबरोबरचे अनेक मजेशीर आणि विनोदी व्हिडीओ शेअर करतो. त्याच्या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. अशातच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आगामी चित्रपटाविषयीची माहिती देत खास पोस्ट शेअर केली आहे. यावरून धनंजय एका हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे कळत आहे
इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे धनंजयने माहिती देत असं म्हटलं आहे की, “मी तुम्हाला एका नवीन भूमिकेमध्ये दिसणार आहे. काही दिवसांत एक चित्रपट येत आहे, जो अॅमेझॉनवर आहे. यामध्ये वेगवेगळे कलाकार आहेत. तसेच मकरंद देशपांडे सर आणि माझा जिवलग वैभव चव्हाणसुद्धा आहे”. या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याने त्याच्या व्लॉगच्या व्हिडीओची लिंकदेखील शेअर केली आहे. या व्लॉग व्हिडीओच्या माध्यमातून त्याने चित्रपटाची माहिती दिली आहे. तसंच यातील खास लूकही शेअर केला आहे.
धनंजय पोवारने त्याच्या युट्यूब चॅनेलवर या चित्रपटासंबंधित एक व्लॉग व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनुसार धनंजय हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘Kaalkarmmar’ असं या चित्रपटाचं नाव आहे आणि यात तो अभिनेते मकरंद देशपांडे व ‘बिग बॉस मराठी’मधीलच वैभव चव्हाण आणि काही अन्य कलाकार यांच्याबरोबर दिसणार आहे. या चित्रपटात धनंजय एका साधूबाबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचे त्याच्या लूकवरुन दिसत आहे.
चित्रपटातील हा खास लूक करत असतानाचा मेकिंगही धनंजयने त्याच्या व्लॉगमधून दाखवलं आहे. तसंच सेटवरील इतर मजामस्ती आणि शूटिंगचे काही खास क्षण धनंजयने व्लॉगमधून चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये अनेकांनी धनंजयला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्याला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुकताही व्यक्त केली आहे.
दरम्यान, धनंजयने एक व्यावसायिक म्हणून लोकप्रियता आणि यश मिळवलं आहे. शिवाय तो सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर म्हणून प्रसिद्ध आहे. व्यावसायिक आणि कंटेट क्रिएटर म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर डीपी आता अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्जा झाला आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना धनंजयच्या ‘Kaalkarmmar’ चित्रपटाची व अभिनेता म्हणून पाहण्याची उत्सुकता लागली आहे.