Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वातील अनेक स्पर्धक चांगलेच गाजले. ७० दिवसांत हा शो संपला असला तरी या स्पर्धकांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं. अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर यांच्याप्रमाणेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवारने त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बिग बॉस’च्या पहिल्या दिवसापासून वादावादी, मैत्री आणि भांडणं पाहायला मिळाली. पण धनंजयने आपल्या विनोदी स्वभावामुळे घरातील वातारण नेहमीच हसतं-खेळतं ठेवलं.

धनंजय पोवारने शेअर केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष

धनंजयचा हा मजेशीर स्वभाव कायमच त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. शिवाय धनंजय सोशल मीडियावर पत्नी व आईबरोबरचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. अशातच धनंजयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने नुकतीच शेअर केलेली ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

धनंजय पोवार म्हणाला, “आमच्यात नाराजीचे प्रमाण वाढत चालले आहे”

धनंजयने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “तुम्ही जे करताय त्यातून आमची नाती तुटतात. कारण नसताना कोणत्याही प्रकारच्या प्रमोशनसाठी माझ्या जवळच्या मित्रांना किंवा आमच्या पाहुण्यांना मध्ये आणायचा प्रयत्न करू नका. त्यांना माझा वेळ मिळाला नाही. तर आमच्यात नाराजीचे प्रमाण वाढत चालले आहे.”

धनंजय पोवार इन्स्टाग्राम स्टोरी
धनंजय पोवार इन्स्टाग्राम स्टोरी

धनंजय पोवार म्हणाला, “गैरसमज करून घेऊ नका”

यापुढे त्याने आवाहन करत असं म्हटलं आहे की, “मित्रांना आणि पाहुण्यांना पण सांगतो तुम्हीसुद्धा यामध्ये पडून गैरसमज करून घेऊ नका. काही कामानिमित्त किंवा कार्यक्रमानिमित्त मी जर तुम्हाला वेळ नाही देऊ शकलो तर समजून घ्या. लोक कमी पण मित्र भरपूर नाराज व्हायला लागले आहेत.” दरम्यान. त्यांची ही पोस्ट नक्की कशाबद्दल आहे हे कळू शकलेलं नाही.

‘बिग बॉस मराठी ५’ नंतर धनंजय पोवारचा नवा शो

धनंजय पोवार हा आपल्या कॉमेडी व्हिडीओसाठी सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये त्याचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. त्यानंतर आता तो लवकरच स्टार प्रवाहवरील ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत.

‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

‘शिट्टी वाजली रे’ या शोमध्ये धनंजय पोवारसह पुष्कर श्रोत्री, निक्की तांबोळी, घनःश्याम दरवडे, गौतमी पाटील, रुपाली भोसले, विनायक माळी, स्मिता गोंदकर, अशिष पाटील, माधुरी पवार अशी बरीच कलाकार मंडळी आहेत. येत्या २६ एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता हा शो पाहायला मिळणार आहे.