‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आपल्या भांडणांमुळे चर्चेत राहिलेली निक्की तांबोळी लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. निक्की पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती लवकरच ‘बदनाम’ चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होईल आहे.
निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ती तिच्या चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत असते. आता निक्कीने ती एक आयटम साँग करणार असल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा – सनी लिओनीचा सरकारी योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीत नाव आल्यावर संताप; म्हणाली, “माझी ओळख…”
े
निक्की म्हणाली, “‘बदनाम’ सिनेमाचा एक भाग झाल्याने मी खूप उत्साहित आहे. हे गाणं तुम्हाला उठून नाचायला भाग पाडेल. अशा अप्रतिम टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला हे गाणं शूट करताना जेवढी मजा आली, तेवढंच माझ्या चाहत्यांना हे गाणं आवडेल अशी मला आशा आहे.”
निक्की तांबोळी जे आयटम साँग करतेय, ते प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने गायलं आहे. ‘बदनाम’ चित्रपट फेब्रुवारी २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. जय रंधावा, जास्मिन भसीन आणि मुकेश ऋषी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. हा एक रोमँटिक ड्रामा सिनेमा आहे.
निकी तांबोळीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. २०१९ मध्ये, तिने ‘चिकाती गडिलो चिथाकोटुडू’ या तेलुगू हॉरर कॉमेडी चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘कांचना ३’ या ॲक्शन हॉरर चित्रपटातून तमिळमध्ये पदार्पण केले होते. तिचा तिसरा चित्रपट ‘थिप्पारा मीसम’ होता.
निक्की २०२० मध्ये बिग बॉस १४ या हिंदी रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. त्यानंतर तिने यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात भाग घेतला. मराठीतही ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आता ती पंजाबी चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निक्कीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या बिग बॉस मराठी फेम अरबाज पटेलला डेट करत आहे.