Bigg Boss Marathi 5 First Elimination: ‘बिग बॉस मराठी ५’ सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. या शोमध्ये पहिलाच आठवडा खूप चढ-उतारांनी भरलेला राहिला. या आठवड्यात अनेकांची भांडणं झाली व त्यामुळे ‘भाऊचा धक्का’ मध्ये होस्ट रितेश देशमुखने अनेकांची शाळा घेतली. त्यानंतर या आठवड्यातील पहिलं एव्हिक्शन पार पडलं. पहिल्याच आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर गेला, त्याच्या नावाची घोषणा झालेली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या आठवड्यात वर्षा, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, पुरुषोत्तमदादा पाटील हे सदस्य नॉमिनेट झाले होते, त्यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील यांचे आव्हान समाप्त झाले आणि त्यांनी या शोमधील सदस्यांचा निरोप घेतला. घरात एकूण १६ स्पर्धकांनी एंट्री घेतली होती, त्यापैकी पहिलं एव्हिक्शन पार पडल्याने १५ स्पर्धक उरले आहेत. या शोचा विजेता कोण होऊ शकतो, याबाबत पुरुषोत्तमदादा पाटील यांनी घरातून बाहेर पडताना अंदाज व्यक्त केला. त्यांनी गायक अभिजीत सावंत विजेता होऊ शकतो, असं म्हटलं आहे. पुरुषोत्तमदादा पाटील छोटा पुढारी घनश्याम भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

Purushottamdada Patil
कलर्स मराठीने पुरुषोत्तमदादा पाटील यांच्या एव्हिक्शनची पोस्ट केली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

बिग बॉसच्या घरात येण्याआधी काय म्हणाले होते पुरुषोत्तमदादा पाटील?

आळंदी, पुणे, मुंबई, रायगड येथील मठांचे प्रसिद्ध मठाधिपती तसेच किर्तनाचा वारसा लाभलेले पुरुषोत्तमदादा यांनी कलेच्या व विचारांच्या बळावर ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता. “रितेश देशमुख हे नाव समोर आल्यावर मला माऊली हा शब्द समोर आला. कारण माऊलीशी मी खूप जवळचा आहे. माझ्या हातामध्ये ब्रेसलेट आहे ते देखील माऊलीचे आहे तसेच हातावर टॅटू काढला आहे तो देखील माऊलीचाच आहे आणि सर्वात महत्त्वाचे मी माऊलीच्या गावातला आहे. रितेश देशमुख यांना पहिल्यानंतर मी माऊलीमय झालो,” असं ते बिग बॉसच्या घरात येण्याआधी म्हणाले होते. पण त्यांचा प्रवास पहिल्याच आठवड्यात संपला होता.

Video: “हात खाली, आता मी बोलतोय”, रितेश देशमुखने घेतला निक्कीचा समाचार; म्हणाला, “मराठी माणसाचा अपमान…”

‘बिग बॉस मराठी’चा पहिला आठवडा

‘बिग बॉस मराठी’चा पहिला आठवडा प्रचंड गाजला, स्पर्धकांची एकमेकांशी कडाक्याची भांडणं झाली. त्यानंतर पहिल्याच ‘भाऊचा धक्का’ मध्ये निक्की तांबोळीला रितेश देशमुखने सुनावलं. आठवडाभर अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा अपमान केल्याप्रकरणी रितेशने निक्कीला त्यांची माफी मागायला लावली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही’, असे खडे बोल रितेशने निक्कीला सुनावले. यानंतर पंढरीनाथ कांबळे सध्या बघ्याच्या भूमिकेत असल्याचं रितेश म्हणाला. याशिवाय इतर सदस्यांचीही रितेशने कानउघडणी केली.

“आता सगळ्यांचा माज उतरणार”, रितेश देशमुखने निक्कीला सुनावल्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठी माणसांबद्दल…”

‘बिग बॉस मराठी’चा दुसरा आठवडा सुरू झाला आहे, दुसऱ्या आठवड्यात या घरामध्ये कोणाचे कोणाशी वाद होणार, बिग बॉस या स्पर्धकांना काय टास्क देणार व घरात कोणते गोंधळ होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ‘बिग बॉस मराठी’ हा शो दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होतो. तसेच तुम्ही जिओ सिनेमावरही हा शो पाहू शकता.