Bigg Boss Marathi 5 च्या पर्वाची अनेक गोष्टींमुळे सतत चर्चा होताना दिसते. यापैकी अरबाज आणि निक्कीचे नाते एक आहे. अरबाज पटेल गर्लफ्रेंड असूनदेखील त्याची निक्कीबरोबर असलेली जवळिकता अनेकदा चर्चेचा विषय ठरते. आता ‘स्प्लिट्सव्हिला १५’मधील स्पर्धक दिग्विजय राठीने यावर वक्तव्य केले आहे. स्प्लिट्सव्हिला १५ मध्ये अरबाजदेखील स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.
स्पर्धकांच्या जवळच्या व्यक्ती, मित्र, नातेवाईकदेखील अनेकविध वक्तव्य करताना पाहायला मिळते. आता अरबाज खानच्या खेळाबद्दल आणि निक्कीबरोबर असलेल्या त्याच्या जवळिकतेबद्दल ‘स्प्लिट्सव्हिला’मधील स्पर्धक दिग्विजय राठीने याबद्दल वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला दिग्विजय?
दिग्विजय राठीने नुकतीच ‘टेलि मसाला’ला मुलाखत दिली. त्यावेळी त्याला अरबाज आणि निक्की यांच्यात जवळिकता निर्माण झाल्याचे दिसत आहे, याबद्दल तुला काय वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्याने म्हटले, “जर त्याचे बाहेर कोणाशीतरी नाते आहे, तर हे चुकीचे आहे. जर तो मनाने इतका कमजोर आहे, तर त्याने बाहेर सगळं स्पष्ट करून जायला पाहिजे होतं. स्प्लिट्सव्हिलामध्येदेखील त्याने असे केले होते. आम्ही जेव्हा शो करत होतो, तेव्हाच आम्हाला माहीत झालं होतं की, त्याची कोणीतरी बाहेर गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे ती चुकीची गोष्ट आहे आणि बाहेर जी मुलगी आहे ती विचार करत असेल की तो माझाच आहे, त्या गोष्टी बरोबर आहेत, तर तीदेखील चुकीची आहे.”
पुढे बोलताना त्याने म्हटले, “मला वाटते की, जर तुमचे मन निर्मळ असेल तर शोसाठी या गोष्टी करणे गरजेचे नसते. पण, ही गोष्टदेखील आहे की तुम्ही त्या घरात एकटे असता, तुमच्याकडे फोन नसतो, तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी जोडले जाता. आता हे नेमकं काय आहे, हे शो नंतरच पाहायला मिळणार आहे. मी पूर्ण शो पाहिला नाही, पण तो इतर गोष्टींमध्येदेखील सक्रिय असेल. टास्क खेळत असेल, पण फक्त खेळासाठी लव्ह अँगल तयार करत असेल तर तो चुकीचा आहे आणि हे खरं असेल तरीही जी मुलगी बाहेर आहे, तिच्यासाठी वाईट आहे.”
दरम्यान, अरबाज पटेल बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होण्याआधी स्प्लिट्सव्हिला १५ मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याचे नाव स्प्लिटसव्हिलामधील स्पर्धक नायरा अहुजाबरोबर जोडले गेले होते. जेव्हा शो संपला, त्यावेळी तो आधीपासून लीझा बिंद्रा नावाच्या तरुणीबरोबर नात्यात असल्याचे समोर आले. आता बिग बॉस मराठीच्या पर्वात निक्की आणि त्याच्यामध्ये जवळिकता पाहायला मिळत आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. लीझानेदेखील सोशल मीडियावर अरबाज पटेलबरोबर नात्यात असल्याची कबुली दिली आहे. आता बिग बॉसच्या घरात त्याच्या निक्कीबरोबरच्या नात्याचे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.