Bigg Boss Marathi 5 च्या पर्वातून तिसऱ्या आठवड्यात दोन सदस्यांनी निरोप घेतला. योगिता चव्हाण व निखिल दामले हे दोन सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. आता निखिल दामलेने एका मुलाखतीदरम्यान, रितेश देशमुखने काय सल्ला दिला होता, बिग बॉसमधील त्याचा प्रवास कसा होता याबद्दल वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला निखिल दामले?

निखिल दामलेने ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुखने काय सल्ला दिला होता, हे सांगितले आहे. तो म्हणतो, “रितेशसरांनी सांगितलं होतं की, प्रत्येक वेळी तुम्ही आवाज चढवून भांडण केले पाहिजे, असा अट्टहास नको. तुमची पद्धत जर वेगळी असेल, तर तुमच्या पद्धतीनंही मत मांडण्यात कमी पडू नका. तुम्ही त्याबद्दल काही वक्तव्य केलं नाही, असं होऊ देऊ नका.

मला जिथे जिथे व्यक्त होता आलं, तिथे तिथे मी मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण, काही गोष्टी अशा आहेत, काही परिस्थिती अशा होत्या की, तिथे मी माझे मत प्रभावीपणे मांडू शकलो नाही. यावर माझं दुमत नाही. असं अजिबात नाही की, माझं काहीच चुकलं नाही. रितेश सर जे बोलतात भाऊच्या धक्क्यावर, ते त्यांचं तर मत असतंच; पण ते प्रेक्षकांचंदेखील प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ते लक्षात घेऊन आचरणातदेखील आणलं पाहिजे,” असे मत निखिल दामलेने व्यक्त केले आहे.

हेही वाचा: ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटाचे दिग्दर्शक कोलकात्यातून बेपत्ता; शेवटचं कोणी पाहिलं? पत्नीने दिली महत्त्वाची माहिती

निखिल दामलेबरोबरच योगिता चव्हाणदेखील घराबाहेर पडली आहे. तिने, खेळापेक्षा आपले मानसिक स्वास्थ्य जास्त महत्त्वाचे आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या पाचव्या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. यामधील तीन स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. आता चौथ्या आठवड्यात कोणत्या स्पर्धकाला घराचा निरोप द्यावा लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्याबरोबरच या आठवड्यात बिग बॉस सदस्यांना कोणते टास्क देणार आणि सदस्य तो टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे असणार आहे. सत्याचा पंचनामा हा टास्क सध्या बिग बॉसने सदस्यांना दिला आहे आणि या टास्कमध्ये टीम ए मध्ये फूट पडताना दिसत आहे. आता खेळ जसा पुढे सरकेल, तशी घरातील सदस्यांची समीकरणे बदलणार का, हे पाहणेदेखील महत्त्वा़चे आहे.