Bigg Boss Marathi च्या पाचव्या पर्वाची सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होत असते. घरातील सदस्यांमध्ये होणारी भांडणे, बिग बॉसने दिलेले टास्क, सदस्यांची एकमेकांबरोबर असलेली समीकरणे, घरात घडणाऱ्या गमतीजमती या सगळ्याचे बाहेरच्या जगावरही पडसाद उमटताना दिसतात. आता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्या सोनाली पाटीलने निक्की तांबोळीच्या खेळावर वक्तव्य केले आहे.

काय म्हणाली सोनाली पाटील?

सोनाली पाटीलने नुकतीच ‘अल्ट्रा बझ मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ‘बिग बॉस’च्या घरातील सर्व सदस्यांच्या खेळावर वक्तव्य केले आहे. निक्की तांबोळी आणि अरबाजच्या खेळाबद्दल बोलताना तिने म्हटले, “सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निक्कीच्या विरोधात आधी घर झालं आणि मग ते दोघे पुन्हा एकत्र आले. मला असं वाटतं की, आधी त्यांनी गेम खेळला आहे, त्यामुळे काही गोष्टी ते ठरवून करत आहेत. स्वत: अरबाज म्हणाला आहे की मी कमिटेड आहे, तरीसुद्धा ते एकत्र आलेत. त्यांच्या एकत्र येण्याला आपण खूप चांगली मैत्री म्हणू शकतो. कारण त्या घरात प्रत्येक जण प्रत्येकाला बाहेर काढण्यासाठी असतो, त्यामुळे जो कोणी आपल्या बाजूला असतो, तो आपला मित्र असतो.”

पुढे बोलताना ती म्हणते, “अरबाजच्या तुलनेत निक्की मला फार स्पष्ट वाटते. अरबाज बऱ्याचदा निक्कीच्या विरोधात इतरांशी बोलतो. पण, निक्की अरबाजच्या विरोधात एकदाही बोललेली नाही. जे बोललीय ते चांगलं बोललीय. अरबाज इतर सदस्यांबरोबर तर गेम खेळतच आहे, पण निक्कीबरोबरदेखील गेम खेळत आहे, हे निक्कीला माहीत नाही. अरबाज तिच्यासमोर एक असतो आणि बाकींच्यासमोर एक असतो. निक्की खरंच चांगलं खेळतेय. सगळ्या घराला उकसवण्याचं ती काम करते, पण तिची एक गोष्ट मला फार आवडते; ती म्हणजे निक्की जे काही आहे ते तोंडावर बोलते”, असे म्हणत सोनालीने आपले मत मांडले आहे.

हेही वाचा: IC-814: The Kandahar Hijack: कंदहार हायजॅक वेबसीरीजमध्ये अतिरेक्यांची हिंदू नावे; वाद उफाळल्यानंतर नेटफ्लिक्सनं दिलं उत्तर

दरम्यान, बिग बॉसच्या पाचव्या पर्वात गेल्या आठवड्यात घरातील सर्व सदस्यांची समीकरणे बदलल्याचे पाहायला मिळाले होते. अरबाज आणि निक्की यांच्यामध्ये मोठे भांडण झाल्याचेदेखील दिसले होते. याबरोबरच टीम एमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. आता या आठवड्यात घरात आणखी कोणता कल्ला होणार, नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी कोणाला घराच्या बाहेर पडावे लागणार आणि कोणत्या सदस्याचा गेम आणखी प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.