Bigg Boss Marathi 5 पर्वाचा हा तिसरा आठवडा विविध कारणांमुळे गाजला. या आठवड्याची मोठी चर्चा झाली. अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, आर्या, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर या स्पर्धकांची भांडणे झालेली पाहायला मिळाली. घरातील सदस्य भावुक झाल्याचेदेखील दिसले. कॅप्टन्सीची टास्कदेखील चांगलाच रंगलेला दिसला. आता कलर्स मराठीने आज प्रदर्शित होणाऱ्या ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडचा एक प्रोमो शेअर सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश देशमुख या आठवड्यात एका हिरोचा जन्म झाला, असे म्हणत घरातील एका सदस्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
सुरज चव्हाणबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख?
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, रितेश देशमुख म्हणतो, “या आठवड्यात एका हिरोचा जन्म झाला. ज्यानं त्या संधीचं सोनं केलं. त्याचं नाव आहे, सूरज चव्हाण. तुम्ही एकट्याने या सगळ्यांना चांगली लढत दिली. भेडिये झुंड में आते है, शेर अकेला आता है” असे म्हणत त्यांनी सुरजच्या खेळाचे कौतुक केले. शेवटच्या वाक्याला सुरज चव्हाणने त्याला साथ दिल्याचे पाहायला मिळत आहे.
या आठवड्यात घराचा दुसरा कॅप्टन निवडण्यासाठी बिग बॉसने सदस्यांना एक टास्क दिला होता. त्यामध्ये दोन टीम करण्यात आल्या होत्या. टीम ए आणि टीम बी यामधील कोणता गट जिंकेल त्या गटातील सदस्य कॅप्टन्सीसाठी दावेदार ठरणार होते. टीम ए ने पहिला टास्क जिंकत कॅप्टन्सीसाठीची दावेदारी निश्चित केली. यामध्ये अरबाज पटेल, निक्की तांबोळी, घन:श्याम दरेकर, निखिल दामले, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, आणि सुरज चव्हाण हे सदस्य होते. यांना आपापल्या फ्रेंच फाइजचे संरक्षण करायचे होते, याबरोबरच इतर सदस्याचे फ्रेंच फाइज मोडूदेखील शकणार होते. यावेळी सूरज चव्हाण एकटा सगळ्यांना भिडल्याचे पाहायला मिळाले होते. हा टास्क जिंकत अरबाज पटेल घराचा दुसरा कॅप्टन बनला आहे.
आता बिग बॉस मराठी ५चा सूत्रसंचालक रितेश देशमुखने त्याचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर देखील नेटकरी सुरजचे कौतुक करताना दिसत आहे.
दरम्यान, आता तिसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर आणखी कोणत्या स्पर्धकाला रितेश देशमुखकडून शाबासकी मिळणार आणि कोणत्या सदस्याची शाळा घेतली जाणार हे पाहणे महत्वाचे आहे. याबरोबरच, कोणता सदस्य बिग बॉसच्या घराला निरोप देणार हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.