Bigg Boss Marathi 5 व्या पर्वात कलाकारांबरोबरच सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सरना बघितल्यानंतर अनेकविध प्रतिक्रिया पाहायला मिळत होत्या. सोशल मीडियावर त्याबद्दल मोठ्या चर्चा होत असल्याचेदेखील दिसत होते. मात्र, बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका नावाची खूप चर्चा झाली. ते नाव म्हणजे सूरज चव्हाण होय. आता कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणची निवड बिग बॉसच्या पर्वात कशी झाली, याबद्दल खुलासा केला आहे.

काय म्हणाले केदार शिंदे?

कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनी नुकतीच ‘नवशक्ती’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी सूरज चव्हाणची बिग बॉसमध्ये कास्टिंग कशी झाली, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटले, “कास्टिंग करणारी जी लोकं आहेत, त्यांनी ते नाव आमच्यासमोर आणलं. थोडसं वेगळं नाव आहे ते, आधी त्याला घ्यावं की नाही असा त्या मंडळींचा प्रश्न होता. पण मी, सुषमा, राजेश आम्ही ठाम होतो. कारण त्याच्यामध्ये साधेपणा आणि आपलेपणा आहे. मला असं वाटतं की मी कुठे काय काम करत होतो आणि जर आज मी या पदावर पोहचतोय तर तो हक्क प्रत्येकाचा आहे आणि तो प्रत्येक माणसाला मिळायला पाहिजे. मी ज्यावेळी त्याला पहिल्यांदा भेटलो होतो, त्यावेळी त्याच्याकडे पाहिल्यावर तो खरा असल्याचे वाटला होता. आज लोक त्याच्यावर प्रेम करत आहेत, आनंद आहे. मला वाटतं की सूरज आयुष्यभर माझ्या खूप जवळ राहील.”

हेही वाचा: Video: “…तर माझं नाव बदल”, संग्राम चौगुलेच्या ‘त्या’ कृतीमुळे निक्कीचा संताप अनावर; पाहा नेमकं काय घडलं

सूरज चव्हाणला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. घरात गेल्यापासून त्याची मोठी चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. अनेकदा भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखकडून त्याच्या खेळाचे कौतुक झाल्याचेदेखील पाहायला मिळते. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकार आणि बिग बॉसच्या आधीच्या पर्वातील स्पर्धक सूरजला पाठिंबा देत असल्याचे मुलाखती आणि सोशल मीडियावरील पोस्टमधून पाहायला मिळते. आता आगामी काळात त्याचा खेळ कसा असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री केलेल्या संग्राम चौगुलेने टॉप ५ मध्ये सूरजला तिसऱ्या स्थानी ठेवल्याचे पाहायला मिळाले. सूरज सध्या घराचा नवीन कॅप्टन झाला असून आता तो घर कसे चालवणार, इतर स्पर्धक त्याच्या कॅप्टन्सीमध्ये त्याला साथ देणार की त्याला त्रास देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.