Bigg Boss Marathi 5 व्या पर्वातील अनेक गोष्टींची मोठी चर्चा झाली. बिग बॉसच्या घराची बदललेली थीम, पाचव्या पर्वाचा सूत्रसंचालक म्हणून रितेश देशमुखने सांभाळलेली जबाबादारी ते स्पर्धक म्हणून कलाकारांइतकीच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची संख्या या सगळ्या गोष्टींची मोठी चर्चा झाली. आता ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या वैभव चव्हाणने यावर वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला वैभव?

वैभव चव्हाणने नुकतीच २ कटिंग पॉडकास्ट(2 Cutting Podcast) ला मुलाखत दिली. यावेळी बिग बॉस मराठीच्या ५ व्या पर्वात कलाकारांबरोबर इन्फ्लुएन्सरची संख्यादेखील तितकीच होती. तर सोशल मीडियामुळे आज जे फेम इन्फ्लुएन्सरना मिळत आहे ते तुम्हाला मिळवता आलं नाही, असं वाटतं का? यावर बोलताना वैभवने म्हटले, “मला वाटतं ही चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळत असेल, तर काय अवघड आहे. अनेकजण म्हणतात की आमच्या काळात असं नव्हतं वैगेरे. आमच्या काळात मी वीस किलोमीटर जायचो. पण आता गाडी आहे ना. तसंच आताची पिढी म्हणणार की तुमच्याकडे मोबाईल नव्हता आता आमच्याकडे मोबाईल आहे.”

“मी फक्त संघर्ष सांगत बसणारा, कारणं शोधणारा मुलगा नाही. तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टींचा तुम्ही चांगला वापर करत आहात. तुमच्याकडे सोशल मीडिया आहे. तुम्ही त्याचा चांगला उपयोग करत आहात. तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवत आहात, तर नक्कीच तुम्ही इंडस्ट्रीसाठी महत्वाचे आहात. तुमचा कटेंट चांगला असेल तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील आणि लोक तुम्हाला डोक्यावर घेत असतील तर तुम्ही मनोरंजनसृष्टीत येऊ शकता. आता उदाहरण म्हणून अंकिता, डीपी दादा, सूरज आहे.”

हेही वाचा: Bigg Boss Marathi : पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर? एलिमिनेशनची सोशल मीडियावर चर्चा

“आता सूरजबाबत सांगायचं तर लोकं आधी त्याला शिव्या द्यायचे. काहीही काय बोलतोय असं वाटायचं लोकांना आणि तेच लोक आता त्याच्या कटेंटवर रील्स बनवतात. तर हे बदलत राहतं. त्याच्या त्याच्या पद्धतीनं तो वरती आलाय. अंकिताचा पण स्ट्रगल आहे. डीपी दादा आहेत. तर हे लोकं कटेंट क्रिएटर आहेत. लोकांचं मनोंरजन करतात. तर ही चांगली गोष्ट आहे. तर असं काही नाही की कलाकार आणि इन्फ्लुएन्सर यांच्यामध्ये फरक करायला पाहिजे. दोघेही त्यांच्या त्यांच्या जागी एकदम बरोबर आहेत”, असे वैभवने म्हटले आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पर्वात सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर असे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले आहेत.