Bigg Boss Marathi Suraj Chavan : सूरज चव्हाण हे नाव गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात गाजलंय. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभाग घेतल्यावर हा ‘गुलीगत किंग’ एवढी मोठी बाजी मारेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र, पहिल्या आठवड्यापासून त्याचा चाहतावर्ग त्याला भक्कम पाठिंबा देत होता. एवढंच नव्हे तर, ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश केल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक त्याला मोठ्या प्रमाणात वोटिंग करून सकारात्मक प्रतिसाद देऊ लागले. अखेर ७० दिवसांनी या सगळ्याची पोचपावची ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीच्या रुपात सूरजला मिळाली.
‘बिग बॉस’मध्ये ( Bigg Boss Marathi ) सुरुवातीला अभिजीतशी संवाद साधताना सूरजने “यंदाची ट्रॉफी मीच जिंकणार” असं वक्तव्य केलं होतं. “ट्रॉफी हातात घेऊन सगळ्यात आधी मी खंडोबाला माझ्या पप्पांकडे जाणार… मग, आई मरीमातेकडे जाणार इच्छा पूर्ण होऊ द्या पप्पा… ओम नम:शिवाय” असं सूरजने अभिजीतला सांगितलं होतं आणि आज हे शब्द त्याने खरे करून दाखवले आहेत.
ट्रॉफी घेऊन सूरज पोहोचला जेजुरीला
सूरज मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन त्याच्या गावी रवाना झाला. पण, आधीच सांगितल्याप्रमाणे सूरजने सर्वात आधी जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं. जेजुरी गडावर जाऊन त्याने आशीर्वाद घेतले. यानंतर बारामतीच्या मोढवे गावी त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. जेजुरी, मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेऊन आता सूरज मोढवे गावी पोहोचला आहे.
सूरजच्या गावी त्याचे स्वागत होत असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गावात त्याची विजयी मिरवणूक काढण्यात आली. झापुक झुपूक करणाऱ्या सूरजला अनेक दिवसांनी गावी परतताना पाहून त्याचे चाहते देखील आनंदी झाले होते. सूरजबरोबर फोटो काढण्यासाठी संपूर्ण गावात मोठी गर्दी झाली होती.
सूरजचा गावी पोहोचल्यावर सत्कार शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर त्याने सर्वांची भेट घेऊन गेले ७० दिवस सपोर्ट केल्याबद्दल आभार मानल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) प्रेक्षकांसह संपूर्ण कलाविश्वातून सूरज चव्हाणवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd