Bigg Boss marathi 5 चे पर्व हे सध्या चांगलेच चर्चेत आहे. अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेल्या शोमध्ये १६ स्पर्धक सहभागी झाले होते. पहिल्या दिवसापासून या स्पर्धकांची चर्चा सुरू आहे. काही स्पर्धक ज्या पद्धतीने इतरांशी वागत आहेत, ते पाहून घराबाहेरील अनेक कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता अभिनेत्री आरती सोळंकीने निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
‘अल्ट्रा मराठी बझ’ या यूट्यूब चॅनेलला आरती सोळंकीने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाविषयी, यामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांविषयी आपले मत मांडले आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
आरती सोळंकीने घरातील सदस्यांविषयी बोलताना म्हटले, “मला वाटते बिग बॉसच्या घरातील एक सदस्य आहे, त्याचे कास्टिंग चुकीचे केले आहे. ती सदस्य म्हणजे इरिना ही आहे. ज्या व्यक्तीने महाराष्ट्रासाठी काही केले नाही, मराठी चित्रपट किंवा मनोरंजनसृष्टीत तिचे काही योगदान नाही. तिला का बिग बॉसमध्ये घेतले आहे, हे मला समजत नाही. तिच्या जागी महाराष्ट्रातला एखादा चांगला कलाकार, जो सध्या संघर्ष करत असेल तो येऊ शकला असता. कलाकारांची गोष्ट सोडली तर महाराष्ट्रातील दुसरा कोणताही व्यक्ती तिच्या जागेवर येऊ शकला असता. मी रील बघत असते, एक पोलिस आहेत, जे उत्तम डान्स करतात. ते का नाहीत बिग बॉसमध्ये? एखादा डॉक्टर असेल जो कुठेतरी चांगलं काम करत असेल, तोदेखील बिग बॉसमध्ये असू शकतो. त्यामुळे मला वाटतं की, इरिनाचं बिग बॉसमधील कास्टिंग चुकीचं आहे.मला ते पटलेलं नाही.” असे मत आरतीने व्यक्त केले आहे.
याबरोबरच आरती सोळंकीने निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्या भांडणाविषयी बोलताना म्हटले, “आमच्यावेळी आऊ होती, तिला टार्गेट करायचे. लोकांना हे माहितेय की जर एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण टार्गेट केले तर आपण चर्चेत येणार आहे. निक्की तर बिग बॉस खेळून आली आहे. तिला माहीत आहे हा खेळ कसा खेळायचा आहे”, असे मत आरतीने मुलाखतीदरम्यान मांडले आहे.
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री आरती सोळंकी सहभागी झाली होती. आता तिसऱ्या आठवड्याच्या भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये रितेश देशमुख कोणत्या स्पर्धकाची शाळा घेणार आणि कोणत्या स्पर्धकाला शाबासकी देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच, या आठवड्यात कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.