Bigg Boss Marathi Aarya Jadhao : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून गेल्या आठवड्यात अमरावतीची मराठमोळी रॅपर आर्या जाधवला निष्कासित करण्यात आलं. कॅप्टन्सी टास्कच्यावेळी आर्याने निक्कीला कानशि‍लात मारल्याची घटना घडली. यानंतर निक्कीने संपूर्ण घरात जोरजोरात आरडाओरडा करून रडून गोंधळ घातला. तिच्या मागणीनंतर ‘बिग बॉस’कडून संपूर्ण फुटेज तपासण्यात आलं. आर्याने निक्कीने कानशि‍लात लगावल्याचं या पडताळणीमध्ये सिद्ध झालं. सुरुवातीला आर्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

हेही वाचा : “ते घर, आतली परिस्थिती…”, Bigg Boss Marathi चा ‘तो’ एपिसोड पाहून अभिनेता झाला भावुक; म्हणाला, “कोणत्याच सदस्याबद्दल…”

आर्याला अचानक बाहेर काढल्याने तिचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’चे प्रेक्षक देखील आर्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहे. घराबाहेर आल्यावर तिने इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन घेत आपली पहिली प्रतिक्रिया जनतेसमोर मांडली आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकणावर निक्कीच्या आई “माझी मुलगी आत मार खायला गेलीय का?” असं म्हणाल्या होत्या. याबाबत सुद्धा आर्याने उत्तर दिलं आहे.

Bigg Boss Marathi मधून बाहेर आल्यावर आर्याची पहिली प्रतिक्रिया

इन्स्टाग्राम लाइव्ह सेशल घेत आर्या म्हणाली, “आज पूर्ण महाराष्ट्र माझ्यासाठी उभा आहे… मी आज माझ्या चाहत्यांचे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे आभार मानते.”

“आता घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला सांगते. तो कॅप्टन्सी टास्क होता आणि बाथरुम परिसरात ही घटना घडली. निक्कीला जाऊन अडवण्याचं काम मी करणार असं आधीच ठरलं होतं. मुळात, निक्कीला गेम खेळता येत नाही. त्या मॅडमला फक्त कावकाव करता येते. जी गोष्ट माझ्याकडून घडली, ती खरंतर घडायला नव्हती पाहिजे. मी केलेली हिंसा चुकीची होती. पण, आतापर्यंत मी गेममध्ये कधीच स्वत:हून कोणाच्या अंगावर गेली नाही. हे सगळ्या प्रेक्षकांनी एवढे दिवस पाहिलं असेल.” असं आर्याने स्पष्ट केलं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi- Video : धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकरमध्ये बिनसलं, डीपी नाराजी व्यक्त करत म्हणाला, “आता बास झालं…”

आर्या पुढे म्हणाली, “मला पहिल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्कीची नखं लागली होती. याआधी सुद्धा तिने बऱ्याच वेळा नखं मारणं, ओढणं, धक्काबुक्की करणं असे प्रकार केले आहेत. हे सगळं मनात साचून राहतं आणि एकदाच बाहेर येतं. तिची आई म्हणाली, माझी मुलगी तिथे मार खायला गेलीये का? नाही काकू आम्ही पण, तिथे मार खायला नव्हतो गेलो. निक्की समोरच्यावर खूप विचार करून हात उचलते…आणि ते कोणाला कळत सुद्धा नाही. आमच्यात झालेल्या धक्काबुक्कीमध्ये सुद्धा तिने आधी मला मारलं…त्यानंतर माझी लगेच प्रतिक्रिया निघाली.”

“निक्कीने यापूर्वी घरात अनेक जणांबरोबर असं केलेलं आहे. अंकिता, मी…टास्कमध्ये ती नेहमी धक्काबुक्की करते. पण, मी एवढंच म्हणेन माझ्याकडून जे घडलं ते मी नव्हतं केलं पाहिजे. कारण माझा स्वभाव तसा नाहीये. पण, तुम्ही मला जो पाठिंबा दिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे” असं सांगत आर्याने तिच्या चाहत्यांसह सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानले.

Story img Loader