Aarya Jadhao Video About Ankita Walawalkar Kunal Bhagat Wedding : ‘बिग बॉस मराठी ५’ फेम कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर व म्युझिक डायरेक्टर कुणाल भगत लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिता व कुणालच्या लग्नाआधीचे सोहळे सुरू झाले आहे. कोकणातील देवबाग येथे दोघांचंही लग्न होईल. कुणाल व अंकिताचे मित्र-मैत्रिणी आणि पाहुणे देवबागला पोहोचत आहेत. याच दरम्यान बिग बॉस फेम आर्या जाधवने अंकिता व कुणालच्या लग्नाबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आर्या जाधवला कोकण हार्टेड गर्लने लग्नाचं निमंत्रण दिलं होतं, मात्र तरीही आर्या लग्नाला जाऊ शकली नाही. तिने इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करून अंकिताच्या लग्नाला ती का जाऊ शकली नाही, त्याचं कारण सांगितलं आहे. लग्नात उपस्थित न राहू शकल्याचं फार वाईट वाटत आहे, असंही आर्या म्हणाली.
“मी अंकिताच्या लग्नाला जाणार होते. तिने मला निमंत्रित केलं होतं. आमचा प्लॅन ठरला होता की जायचं, पण हाताला दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की कुठे जायचं असेल तर सांभाळून जा. आई-बाबाही त्यांची अॅनिव्हर्सरी असल्याने बाहेर गेले आहेत. माझे भाऊ आहेत, ते माझ्याबरोबर घरीच राहणार आहेत. पण या सगळ्यात अंकिताचं लग्न मिस झालं. मला फार वाईट वाटतंय की माझ्या बहिणीच्या लग्नाला मी जाऊ शकले नाही. अंकिता वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. मी कुणालबद्दल खूप ऐकलंय. बिग बॉसमध्ये असताना आम्ही याबद्दलच बोलायचो. योगिताकडून तिच्या पतीबद्दल आणि हिच्याकडून कुणालबद्दल ऐकायचो. त्यावेळी कुणालचं नाव माहीत नव्हतं, पण खूप गोष्टी तिने सांगितल्या होत्या,” असं आर्याने इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करून सांगितलं.
पाहा व्हिडीओ –
“मी तुझ्यासाठी खूप खूश आहे ताई.. मला माफ कर मी लग्नाला येऊ शकले नाही,” असं आर्याने या व्हिडीओवर लिहीलं आहे. हाताला दुखापत झाल्याने आर्या कोकणात अंकिता व कुणालच्या लग्नाला जाऊ शकली नाही.
दरम्यान, अंकिताचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. अंकिताने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अंकिता व कुणाल दोघेही या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.