Bigg Boss Marathi Aarya Slaps Nikki : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जादुई हिरा’ या कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्याची घटना घडली. निक्कीने यानंतर घरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावर आता आर्याला काय शिक्षा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर ‘बिग बॉस’कडून आर्याला प्राथमिक स्वरुपाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आता आर्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे हक्क ‘बिग बॉस’ कोणाला देणार याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात…
कॅप्टन्सी कार्यात निक्की आणि आर्यामध्ये वॉशरुम एरियामध्ये मोठी झटापट झाली. आर्याने, निक्की ‘जादुई हिरा’ घ्यायला येईल म्हणून बाथरुमचा दरवाजा लावून घेतला होता. मात्र, निक्कीने अरबाजला “हा दरवाजा उघड” असं सांगितलं. यानंतर नेमकं काय घडलं याबाबत आर्याने स्वत:ची बाजू मांडत घरात स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली, “दरवाजा उघडल्यावर निक्की आत आली. तिला मी बाहेर घालवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तिचा हात माझ्या डोळ्याखाली लागला आणि या झटापटीत मी तिला मारलं”
हेही वाचा : Bigg Boss Marathi – “अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशिलात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…
‘बिग बॉस’ने आर्याला दिली शिक्षा
निक्कीने पुढे या प्रकरणाची दाद थेट ‘बिग बॉस’कडे मागितली यावर घरातील सर्व क्लिप्स चेक करून ‘बिग बॉस’ म्हणाले, “आर्या आणि निक्कीमध्ये झालेली धक्काबुक्की व नेमकं काय घडलंय याच्या सगळ्या क्लिप्स आम्ही पडताळून पाहिल्या आहेत. दोघींमध्ये धक्काबुक्की होऊन आर्याने निक्कीला कानाखाली मारली आहे. हे कृत्य निंदनीय आहे. त्यामुळे याची शिक्षा म्हणून आर्याला जेलमध्ये टाकावं आणि या प्रकरणाचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेण्यात येईल.”
आता घराचा गेल्या आठवड्याचा कॅप्टन सूरजने आर्याला जेलमध्ये टाकलं आहे. आर्याने भावुक होत अंकिताजवळ मला घरी जायचंय अशी मागणी केली आहे. त्यामुळे एकंदर या प्रकरणावर रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर काय बोलणार याकडे संपूर्ण घराचं तसेच आर्याच्या लाखो चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “ट्रॉफी मिळो न मिळो, मला हिचा गर्व…”, जान्हवीने केला निर्धार, निक्कीबद्दल म्हणाली…
दरम्यान, ‘बिग बॉस’ने जरी आर्याला शिक्षा दिली असली, तरी आर्याचे चाहते आणि नेटकरी तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. निक्कीने आर्याला मारण्यासाठी प्रवृत्त केलं असं बोललं जात आहे. मात्र, कितीही झालं, तरी ‘बिग बॉस’ने दिलेल्या निर्णयानुसार आता अंतिम निर्णय रितेश देशमुख घेणार आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd