गायक अभिजीत सावंत(Abhijeet Sawant) हा बिग बॉस मराठीच्या ५ व्या पर्वात सहभागी झाल्याने मोठ्या चर्चेत आला होता. या पर्वाचा तो उपविजेता ठरला. मात्र, सोशल मीडियावर बिग बॉसचे अनेक किस्से तो सांगताना दिसतो. बिग बॉसच्या शोमध्ये त्याला गुडघ्याला आणि हाताला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले होते. या शोमधून बाहेर पडल्यानंतरदेखील त्याच्या हाताला बँडेज होते. आता याबद्दलचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘बिग बॉस’च्या घरात अभिजीतला झालेली दुखापत; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

अभिजीत सावंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला अभिजीतच्या पत्नीचा शिल्पाचा आवाज ऐकू येत आहे. ती गाडी चालवत असलेल्या अभिजीतला विचारते की, आज कुठे चाललोय आपण? त्यावर अभिजीत तिला ज्या बोटांना दुखापत झाली आहे आणि बँडेज केले आहे ते दाखवतो. त्यानंतर शिल्पा म्हणते, यामागची गोष्ट तुम्हाला लवकरच कळेल. अभिजीत म्हणतो, ही बंदूक आज मी या दोन बोटांतून काढून टाकणार आहे. त्यानंतर दवाखान्यातील व्हिडीओ आहे, ज्यामध्ये त्याच्या बोटांवरून बँडेज आणि स्क्रू काढल्याचे दिसत आहे. दवाखान्यातून परत येताना तो चांगले वाटत असल्याचे म्हणताना दिसतो.

अभिजीत सावंत इन्स्टाग्राम

हा व्हिडीओ शेअर करताना, “बिग बॉसच्या घरात असल्यापासून सांभाळून ठेवलेली ही बंदूक फायनली माझ्या हातातून काढून टाकलेली आहे! आता बरा होत असून आता दिवाळी आनंदी आहे”, अशी कॅप्शन दिली आहे.

अभिजीत सावंतच्या या व्हिडीओवर बिग बॉस मराठी ५ची स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने फायनली असे लिहित हसण्याची इमोजी कमेंट केली आहे. बिग बॉस मराठी ५ नंतर अभिजीत गाण्यांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो.

हेही वाचा: Bigg Boss संपल्यावर सूरज चव्हाण रमला गावच्या शेतात, ट्रॅक्टरही चालवला; नेटकरी म्हणाले, “गावरान मुंडे…”

दरम्यान, बिग बॉस मराठी ५ मध्ये अभिजीत सावंतने आपल्या खेळाने आणि स्वभावाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. प्रेक्षकांनी त्याला मोठा पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र अभिजीत सावंतला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. या शोनंतर दोघेही एकमेकांचे कौतुक करताना दिसले होते. अभिजीत दादाने मला खूप गोष्टी समजाऊन सांगितल्या, असे सूरजने म्हटले होते. आता अभिजीत कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.