Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची यंदा घराघरांत चर्चा झाली. या शोला आधीच्या चार पर्वांपेक्षा टीआरपी सुद्धा सर्वाधिक मिळाला. ‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्याच्या टीआरपीने सुद्धा उच्चांक गाठला होता. शोमध्ये सहभागी झालेले सगळे कलाकार आजही सोशल मीडियावर चर्चेत असतात. ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात जान्हवी किल्लेकर आणि छोटा पुढारी यांच्यात प्रेक्षकांना बरीच वादावादी पाहायला मिळाली होती.
छोटा पुढारी शोमधून एलिमिनेट होण्याआधी सुद्धा दोघांमध्ये वाद झाले होते. मात्र, आता या बहीण भावाची जोडी एका शोमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार असल्याची चर्चा रंगली आहे. छोटा पुढारीने यासंदर्भातील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना हिंट दिल्याचं बोललं जात आहे.
जान्हवी किल्लेकरने काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) अन्य पर्वातील अभिनेत्रींबरोबर रियुनियन झाल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये जान्हवी मीरा जगन्नाथ आणि अमृता धोंगडेबरोबर थिरकताना दिसली होती. या तिघी अभिनेत्री नेमक्या कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र आल्या असतील अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. अखेर छोटा पुढारीने शेअर केलेल्या नुकत्याच एका व्हिडीओमुळे प्रेक्षकांना याबाबत हिंट मिळाली आहे.
छोटा पुढारीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने सोनाली कुलकर्णी, जान्हवी किल्लेकर अशा सगळ्या अभिनेत्रींबरोबर फोटो काढल्याचं पाहायला मिळतंय. यातील पुढच्या एका फोटोमध्ये अमृता धोंगडे, आशय कुलकर्णी, जान्हवी किल्लेकर, स्वत: छोटा पुढारी, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ असे सगळे कलाकार फोटोसाठी एकत्र पोज उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोच्या बरोबर मागे ‘होऊ दे राडा’ असा बॅनर लावल्याचं दिसत आहे. याशिवाय या सगळ्या कलाकारांच्या गळ्यात ‘बिग बॉस’च्या घरात वावरताना घालण्यात यायचे तसे माइक आहेत. यावरून हे नव्या शोचं शूटिंग तर नाही ना? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
दरम्यान, आता हे सगळे कलाकार ( Bigg Boss Marathi ) नेमके कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र जमलेत याचा उलगडा केव्हा होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. जर हा नवीन शो असेल तर, यात आणखी कोण-कोण झळकणार याची उत्सुकता सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे.