Bigg Boss Marathi Ankita Walawalkar : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या ‘फॅमिली वीक स्पेशल’ टास्क चालू आहे. गुरुवारच्या भागात प्रेक्षकांना वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार यांच्या कुटुंबीयांना भेटता आलं. यानंतर आता आजच्या भागात ‘बिग बॉस’च्या घरात ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकरचे बाबा प्रवेश करणार आहेत. हा प्रोमो पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.
‘फॅमिली वीक टास्क’मध्ये सुरुवातीला अंकिताच्या दोन्ही बहिणी घरात येतील…यानंतर ‘बिग बॉस’ आदेश देतात, “अंकिता फ्रीझ…” आणि मुख्य प्रवेशद्वारातून ‘कोकण हार्टेड गर्ल’ तिच्या वडिलांना घरात येताना पाहते. त्यांना पाहताच अंकिता “बाबाSSS…” असा आवाज देते अन् तिला अश्रू अनावर होतात. जवळपास २ महिन्यांनी कुटुंबीयांना भेटल्यावर अंकिता प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : वडिलांना पाहताच अश्रूंचा बांध फुटला! धनंजयच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष; आई अन् पत्नीला पाहिल्यावर केलं असं काही…; पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi : अंकिताने मानले आभार
वडिलांना मिठी मारून रडल्यावर अंकिता हात जोडून ‘बिग बॉस’चे आभार मानते. ती म्हणते, “थँक्यू सो मच ‘बिग बॉस’ तुम्ही माझ्या बाबांना पहिल्यांदा मुंबईत आणलंय” अंकिता मूळची कोकणातली आहे आणि लाडक्या लेकीला दोन महिन्यांनी भेटण्यासाठी तिचे बाबा खास पहिल्यांदाच कोकणातून मुंबईत आले आहेत.

“मुंबईत कधीही पाऊल न ठेवलेले आपले बाबा, Specially आपल्याला भेटायला आलेत… हे पाहताच अंकिताला अनावर झाले अश्रू” असं कॅप्शन देत कलर्स मराठी वाहिनीने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अंकिता व तिच्या कुटुंबीयांचा हा प्रोमो पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये ‘कोकण हार्टेड गर्ल’ व तिच्या वडिलांमधलं बॉण्डिंग पाहून आनंद व्यक्त केला आहे.
आजच्या भागात अंकितासह पंढरीनाथ, सूरज आणि निक्कीचे कुटुंबीय देखील घरात उपस्थित राहतील. त्यामुळे हा फॅमिली वीक टास्क संपूर्ण घराचं वातावरण भावनिक करणार आहे. दरम्यान, येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यात कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.